Sunday, February 15, 2026

गोष्ट आईची !!


ही पोस्ट, खास आईच्या पंचाहत्तराच्या वर्षात पदार्पणा निमित्त्त! ७५ वर्षांची गोष्ट एवढ्या लहान पोस्ट मध्ये मावणार नाहीच. पण हा छोटासा प्रयत्न!

आईचा जन्म कर्नाटकातील छोट्याश्या कोकतनूर गावामधला ! ती अगदी लहान असताना आजी आणि आजोबा महाराष्ट्रातील अहमदनगर (आजचे अहिल्यानगर) मध्ये आले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यामुळे आईला कानडी आणि मराठी दोन्ही भाषा येतात. पण महाराष्ट्रात लहानाची मोठी झाल्याने मराठी वर विशेष प्रभुत्व !

आजोबांचे टेलरिंग चे दुकान आणि आजी केतकर हॉस्पिटल मध्ये काम करायची. घरची परिस्थिती तशी बेताचीच. आई च्या पाठी २ मावश्या आणि एक मामा. त्यामुळे आई काही वर्षे तिच्या मामांकडे सुद्धा राहिली. साहजिकच मोठी मुलगी म्हणून तिच्याकडून अपेक्षा आणि जबाबदाऱ्याही होत्याच. घरी शाळेची फी भरायला सुद्धा पैसे नसताना पुस्तकं मिळणे लांबची गोष्ट. पण तरीही तिने शिकायची जिद्द सोडली नाही. मोठी होऊन तिने शिक्षिका व्हायचे ठरवले. D.Ed. च्या प्रवेश साठी सुद्धा त्या काली लागणारी १ रुपया फी तिच्याकडे नव्हती. आजीचे मामा डॉक्टर हणमंतराव कुलकर्णी यांनी तिची फी भरली आणि तिला प्रवेश मिळाला. 

पुस्तके विकत घेता येत नसल्याने ती वर्गातच संपूर्ण लक्ष देऊन notes काढायची किंवा कधी कधी मैत्रिणी बरोबर पुस्तक share करून अभ्यास करायची. उत्तम बुद्धिमत्ता आणि शिकायची जिद्द असल्यामुळे परीक्षेत तिचा पेपर सर्वात उत्तम असायचा. शिक्षक तिचा पेपर मुलांना दाखवायचे कि असा अभ्यास असला पाहिजे. जेव्हा त्यांना कळले कि ती फक्त त्यांच्या नोट्स वरून अभ्यास करते, त्यांनी तिला कॉलेज च्या वाचनालयाची विशेष सवलत मिळवून पुस्तके दिली. 

शिक्षिका झाल्यावर तिने नगरच्या दादा चौधरी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी स्वीकारली.  जसा स्वतः अभ्यास मनापासून करायची तशीच तिचे शिकवणे सुद्धा खूप मनापासून होते. शिकवताना नेहेमी नवीन नवीन पद्धती वापरून ती मुलांना विषय उत्तम समजावून सांगायची. 

लग्न झाल्यावर बाबांनी तिला बी.एड. करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तेव्हा ती पहिल्यांदाच आई सुद्धा होणार होती. पण बाबांनी तिला मागे फिरू दिले नाही. नोकरी, घरातली कामं, सासरची माणसे आणि एक नवीन जबाबदारी पोटात असताना, वारंवार उलट्यांनी बेजार होत असताना देखील तिने नेटाने परीक्षा दिली आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण सुद्धा खाली. बाबांबरोबरच तिच्या आई चा आणि बहिणी चा तिला खंबीर पाठिंबा होता. तिची लाडकी लहान बहीण रेखा मावशी, आजही तिची सतत सुख दुःखात साथ देणारी. आजी चे घर गावातच असल्याने तीच तिची सपोर्ट सिस्टिम होती. आजीनेही वेळो वेळी आम्हाला सांभाळून तिला खंबीर साथ दिली. 

आम्ही तिघी बहिणी आईच्याच शाळेत जात असू. आमचे घर शाळेपासून ९ किलोमीटर लांब. त्या काळी कामाला कुणी मिळत नसे. पण घराचे सगळे करून, आम्हाला बरोबर घेऊन ती रोज बस ने शाळेत घेऊन जायची आणि तिच्या बरोबर परत आणायची. बाबा सुद्धा शक्य तेवढा प्रयत्न करायचे आम्हाला गाडी वर घ्यायला यायचा.

पण एवढा सगळं रोज करणे याचा दोघांनीही कधी बाऊ केलेला मला आठवत नाही. आईच्या शाळेत होतो पण आईने नेहेमी दुसऱ्या शिक्षकांच्या वर्गात घातले आम्हाला. बाईंची मुलगी म्हणून थोडे लाड व्हायचे पण अवाजवी लाड होणार नाहीत याकडे तिचे कटाक्षाने लक्ष असायचे. त्यामुळे आम्ही चुकलो कि शिक्षा सुद्धा व्हायची!

आपली आई एक जबाबदार शिक्षिका आहे, तिचे तिच्या कामावर प्रेम आहे आणि ते उत्तम करण्याची तिची नेहेमी धडपड चालू असते हे तेव्हाही नकळत समजत होते आम्हाला. कुठलाही कार्यक्रम असला कि त्याचे नियोजन ते समारोप याची जबाबदारी बऱ्याच वेळा आई कडे असायची. तिचे वक्तृत्व, लिखाण, सूत्रसंचालन  नेहेमी उत्तम असायचे. शिकवण्या व्यतिरिक्त शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात तिचा विशेष सहभाग असायचा. मुलांकडून वेगवेगळे कार्यक्रम ती आवडीने सादर करून घ्यायची. मग ती गाणी, नाटक, स्वागत गीत, वक्तृत्व, कथाकथन काहीही असो. ती स्वतः कार्यक्रमासाठी साठी लेखन सुद्धा करायची.

तिचे अनेक विद्यार्थी आजही तिच्या संपर्कात आहेत. निवृत्त झाल्यावर सुद्धा तिचा शाळेशी नेहेमी संपर्क असतो. बऱ्याच वेळा काही सुधारणा करण्यासाठी तिने मदतही केली आहे. तिच्या विद्यार्थ्यांबरोबर आम्हा तिघी मुलींकडून सुद्धा तिने आमच्या गुणांप्रमाणे प्रोत्साहन दिले. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, परीक्षांमध्ये, कार्यक्रमांमध्ये  भाग घेण्यासाठी मार्गदर्शन केले. 

शाळेबाहेर ती लाडकी मावशी, आत्या सुद्धा होती. सुट्टी मध्ये मामा, मावशीची मुलं आवडीने आमच्या घरी राहायला येत. आमच्या साठी पर्वणीच असायची ती. जशी आजीने तिची साथ दिली तशीच तिनेही आजी अजीबची काळजी घेतली नेहेमी. आम्हाला शिक्षण साठी आजी आजोबांकडे ठेवतानाही तीच आमच्यावर बारीक लक्ष असायचे. नंतर बाबांनी तिघींना पुण्यात शिकायला पाठवले तरी तिचा रोज एक फोन असायचा. आमच्या आवाजावरून तिला समजायचे कि काही गडबड आहे का, किंवा आम्हाला काही त्रास आहे का.

मी १२ वि मध्ये असताना आजी चा accident झाला आणि बाबांना डायलिसिस सुरु झाले. माझी लहान बहीण सुद्धा तेव्हा १० वी मध्ये होती. आजी मामाकडे गेली आणि आई बाबांच्या पुण्यात ट्रीटमेंट साठी चकरा सुरु होत्या. वेळोवेळी  बाबांच्या ट्रीटमेंट बरोबर आजीलाही घरी आणून तिची काळजी घेणे अशी तारेवरची कसरत पार पाडताना आमच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये याची तिने कटाक्षाने काळजी घेतली. तुम्ही फक्त अभ्यास करा बाकी मी पाहते अशी नेहेमी खंबीर राहिली ती.

बाबांची ट्रीटमेंट ९-१० वर्षे चालली पण मी कधीही तिला अश्रू गाळत  बसलेले पाहिले नाही.  बाबांचा तिच्यावर खूप विश्वास होता. तिने सगळं खंबीर पणे करावा यासाठी ते नेहेमी तिला प्रोत्साहन देत. बाबा गेले तेव्हा लहान बहिणी चे लग्न सव्वा महिन्यावर होते.पिंडाला कावळा शिवत नव्हता तेव्हा तिने पुढे होऊन सांगितले कि मी गौरी चे लग्न नीट पार पाडेन आणि लगेच कावळा शिवला.  कुठले connection होते हे?  बाबा तिचे नेहेमी कौतुक असायचे. तिच्यासमोर तिची मजा करायचे पण ती नसली कि आम्हाला सांगायचे ती सगळं कसं उत्तम पार पाडते. 

घर नोकरी सगळं सांभाळताना तिला वाचायची आवड जपायला खूप वेळ मिळायचा नाही पण ती रोज काही नाही काही वाचायची.सुट्टीमध्ये एखादे पुस्तक, ऐरवीरोजचा पेपर तर नक्कीच वाचायची. त्यामुळे ती नेहेमी अपडेटेड असायची. सगळं सांभाळून ती स्वाध्याय परिवारात सुद्धा सामील झाली. मा. पांडुरंग शास्त्रीची सगळी पुस्तके तिने वाचली होती. निवृत्त झाल्यावर तिने ज्ञानेश्वरी, गीता आणि दासबोध यांचाही अभ्यास केला. सत्तरी नंतर तिने आत्ताच दासबोधाच्या परीक्षा सुद्धा दिल्या. आजही तिची आकलन शक्ती खूप छान  आहे. कुठल्याही विषयवार ती उत्स्फूर्त पणे लिहू आणि बोलू शकते. कविता देखील करू शकते.

प्रचंड जनसंपर्क. खूप साऱ्या मैत्रिणी, जाईल तिकडे माणसे जोडणे. दुसऱ्यांची नेहेमी मदत करणे. सतत आनंदी आणि उत्साही राहणे, सतत काही तरी नवीन शिकायचा, करायचा ध्यास त्यामुळे या वयात सुद्धा एकटी सगळं manage  करते. कधीही आम्हा मुलींकडून कडून कसली अपेक्षा केली नाही. स्वयंपूर्ण राहणे , उलट सतत आम्हालाच वेळो वेळी सपोर्ट करणे, काहीही झाले तरी मी तुमच्या पाठीशी आहे हा विश्वास नकळत आम्हाला देणे, बाबांची उणीव कधीही भासू न देणे हे सगळं ती लीलया करते. त्यामुळे आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही निश्चिन्त राहू शकतो. 

मुलींबरोबरच सगळ्या जावयांची लाडकी सासूबाई! जावयांना मान  देतानाच त्यांच्याशी नेहेमी खेळीमेळीचे नाते जपणे. बऱ्याच वेळा आम्हा मुलींपेक्षाही जावयांची जास्ती बाजू घेणे, त्यांच्या आवडी निवडी जपणे. ते भेटले कि उत्साहाने त्यांच्या आवडीचा स्वैपाक करून जेवून घालणे यात तिला खूप आनंद वाटतो.  

सगळ्या नातवंडांची लाडकी आजी. कुणाला काय आवडते हे तिला पक्के माहिती. त्याचे सगळे लाड उत्साहाने पुरवते. त्यांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक करते.  आणि विशेष म्हणजे नातवांकडून नवीन नवीन technologies शिकते. मग ते मोबाइलला वापरणे असो, लॅपटॉप वापरणे असो, गाणे किंवा video रेकॉर्ड करणे असो, ई-मेल, whatsapp, facebook, zoom सारखे applications वापरणे असो. काहीही येत नसेल तर नातवंशी बोलून लगेच ते शिकून घेते. 

या वयात सुद्धा तिने कधी सुगम संगीत तर कधी karaoke क्लास लावून गाण्याची आवड जपते आहे. नवीन नवीन गाणी तयार करून ती रेकॉर्ड करून आम्हालाही ऐकायला पाठवते. 

तिला प्रवासाची सुद्धा खूप आवड आहे. कुणावरही अवलंबून नं राहता मैत्रिणी किंवा बहिणी बरोबर वेगळ्या वेगळ्या सहलींसाठी जाते. वेगवेगळी ठिकाणे पाहते. त्याबद्दल लिखाणही करते. 

निवृत्त जीवन म्हणजे एक शेवट नाही तर नवीन सुरुवात असते आणि त्याचा पुरेपूर सन्मान करून मिळालेले  आयुष्य अर्थपूर्ण जगण्याचा तिचा सतत प्रयत्नअसतो. 



आज तिच्या या विशेष सोहळ्यानिमित्त तिला खूप खूप शुभेच्छा!. 

अशीच नेहेमी आनंदी, खंबीर आणि आरोग्यपूर्ण रहा. भरभरून आयुष्य जग आणि तुझं आमच्या पाठीशी असणं हे असंच आमचं नेहेमी शक्ती स्थान असावं ही देवाकडे प्रार्थना!





 










 


Friday, January 2, 2026

जुळून येति रेशीमगाठी !!




आज विशेष दिवस ! अहो आईचा ७५ वा वाढदिवस ! आणि त्यांच्या लग्नाला पण नुकतेच ५० वर्ष पूर्ण झाले!

मी या कुटुंबात सून होऊन आले त्याला पण आता २१ वर्ष पूर्ण होतील ! जरा थांबून मागे वळून पाहिलं ! कधी भेटले मी या सगळ्यांना? तेव्हा कळत पण नव्हतं  कि माझ्या आई बाबांनी किती विश्वासाने मला एका नवीन आई बाबांकडे सुपूर्त केलं होतं !

नवरोबांचा हात धरून गृह प्रवेश केला पण पलीकडे सख्ख्या बहिणीसारखी साथ देणारी गोंडस नणंद आणि खंबीर पणे  पाठीशी उभे राहणारे नवीन आई बाबा होते.  एक नवीन रोपटं नवीन जागी जसं रुजतं तसंच काहीसं होतं ते ! नातेवाइकांसकट सगळीच माणसं  खूप सांभाळून आणि सामावून घेणारी होती! तरीही थोडी धाकधूक असायचीच सुरुवातीला मनात!

पण आई बाबांनी असा काही जाणवू दिलं  नाही कि हि दुसऱ्या कुटुंबातून आली आहे ! आणि तेही किती सहजपणे केलं त्यांनी !आता हा विचार केला तर किती कठीण असेल त्यांच्यासाठी असं वाटून गेलं ! स्वतःची लाडकी मुलगी नुकतीच सासरी गेलेली आणि घरी आलेल्या नवीन मुलीला आपलंसं करणे हे सोप्पं नसेल नक्कीच ! 

प्रत्येक कामात आई माझ्या बरोबरीने उभ्या असत. मला रोजचा किरकोळ स्वैपाक येत होता पण या घरातल्या पद्धती, कुणाला कसं आवडतं हे सगळं खूप patiently आणि सहजतेने शिकवलं मला. नेहेमी शांत , कुठेही गडबड गोंधळ आरडा ओरडा नाही ! काही चुकलं तर ना रागावता ते हळूच सुधारून टाकत ! एकदा मी पाहुणे येणार म्हणून वांग्याची भाजी केली आणि शेवटी पाणी घालायच्या ऐवजी ग्लास मध्ये ठेवलेलं तेल ओतलं भाजीत ! क्षण भर कळेच ना कि आता काय करू? सगळी भाजी वाया जाईल आणि सगळ्यांना काय वाटेल ! पण आईंनी शांतपणे मोठ्या चमच्याने जास्तीचे तेल  बेमालूम पणे बाहेर काढले आणि कुणालाच झालेली गंमत कळली नाही :) किती हुश्श वाटलं मला आणि नकळत खूप छान  वाटलं त्यांच्याकडे पाहून कि आई आहेत सांभाळून घायला! नवीन नवीन उपमा करताना गरम पाणी घातला कि माझ्या हातून गुठळ्या व्हायच्या रव्याच्या! मग मी त्यांना बोलावून आणायचे पाणी घालायच्या आधी आणि त्या मला शिकवायच्या कसं पाणी घालायचा ते!सगळे सण वार चाली रीती एक एक करत मला जमतील अशा शिकवल्या.  

त्या नेहेमी मला सांगत. घरच्या बाई ने नेहेमी खंबीर असलं पाहिजे! घरात सगळीकडे लक्ष असलं पाहिजे. घर आणि नोकरी दोन्हींचा समतोल साधता आला पाहिजे! त्यांनी स्वतः शिक्षिकेची नोकरी उत्तम रित्या केली होती. तेही घरातले सगळे सांभाळून. त्यांच्या गोष्टी सांगायच्या कधी कधी! नवल वाटायचं मला कि आपल्याला असा जमेल का? माझ्या आई ने पण हि कसरत साध्य केली होती. पण आता त्यामागचे कष्ट कळायला लागले होते.  समोरून आदर युक्त भीती वाटेल असा व्यक्तीमत्व असलेल्या आई हळू हळू मोठा आधार आणि जवळच्या वाटायला लागल्या होत्या. 

उत्तम शिवण काम, उत्तम स्वैपाक, व्यवहार ज्ञान, खंबीरपणा असं भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या आई माझ्या "Go To Person" कधी झाल्या कळलेच नाही. 

इकडे बाबा पण सगळीकडे लक्ष देऊन असायचे. सुरुवातीला कधी आईंच्या ऐवजी काकू म्हणाले कि बाजूला घेऊन सांगायचे आई म्हण तिला :) त्यांच्याही मला वेगळ्या सूचना, माहिती देणे चालू असायचे. मी ऑफिस ची बस पकडायला उशीर झाला कि पळत जायचे रस्त्याने स्टॉप पर्यंत. मग बाबा मागून गाडी घेऊन यायला लागले कि पळत जाऊ नकोस मी सोडतो. मुद्दाम मला light  चे बिल भर, येताना हे घेऊन ये ते घेऊन ये असा काही सांगून माझी परीक्षा घ्यायचे कि मी जबाबदारीने काम करते कि नाही! 

मी जॉब करत असताना पहिल्या नातवाला दिवसभर जबाबदारीने सांभाळणे आणि स्वतःचीही नेहेमीची कामे चालू ठेवणे हे  आनंदाने करत दोघेही. त्यामुळे मला लहान बाळाला सोडून जॉबला जाताना प्रश्न पडला नाही कि त्याला कोण सांभाळेल. किती गरजेचं होता तो आधार हे वेळो वेळो समाजत  होते. आजही त्यांचं  सगळ्या नातवांकडे बारीक लक्ष असतं आणि नातवांचे  पण ते लाड पुरवून घ्यायचे हक्काचे स्थान आहेत :)

एवढ्या वर्षांमध्ये कधी कधी मतभेद होणं अपरिहार्य होते पण कितीही मतभेद झाले तरी कुटुंबाला एकत्र बांधून ठेवताना जो संयम आणि परिपक्वपणा लागतो तो काय असतो याचे त्यांनी नेहेमी नकळत उदाहरण घालून दिले.  आपला जाच न वाटू देता लक्ष देणं आणि गरज असेल तिथे खंबीर पणे पाठीशी उभे राहणं हि सोपी गोष्ट नसते. 

अशा एक ना अनेक खूप गोष्टी आहेत. लाभले आम्हास भाग्य ...कि अशा आई बाबांचे छत्र डोक्यावर आहे! इतके मोठे झालो तरीही लहान असल्याची जाणीव त्यांच्या मुळेच जपली जाते. काहीही झाले तरी आपण हक्काने जाऊ शकतो अशी एक जागा! 

आज त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे. वयाची ७५ री आणि सह जीवनाची ५० शी ! त्यांनी यापुढेही असेच आनंदी, निरोगी आणि खंबीर राहावे ही प्रार्थना आणि सदिच्छा! लग्नाच्या गाठी वर बांधल्या जातात पण त्यांच्या रेशीम गाठी व्हायला हा आशीर्वाद लागतोच !! तो कायम असाच आमच्या पाठीशी असावा हि प्रार्थना ! 








Monday, July 7, 2025

बाते छोटी छोटी - अमेरिकेतील पाहुणे - अतिथी तुम कब....

अमेरिकेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या २ महिने तरी असतात. शाळांना सुट्ट्या असल्याने आणि हवामान चांगले असल्याने बरीच मंडळी प्रवास करतात. कधी मित्रांना / नातेवाईकांना भेटायला तर कधी पर्यटन म्हणून. साहजिकच जून / जुलै म्हणजे पाहुणे आणि पाहुणचार चा सुकाळ!

इथे लोकं लांबून येतात त्यामुळे शक्यतो मुक्काम करणे भाग असते. ऐरवी भेटणे होत नाही त्यामुळे सगळे जण एकमेकांच्या भेटी ची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. खूप प्रेमाने आणि हक्काने घरी येतात. आपण गेलो कि आपलाही पाहुणचार असाच प्रेमाने आणि अगत्यानं करतात. एवढ्या मोठ्या देशात आपली माणसं आहेत हि जाणीव खूप मोलाची असते! 

भारतातून अमेरिकेत आले तेव्हा मला हे सगळं नवीन होतं. इथे सगळी कामं घरी करायची, घराची साफ सफाई, स्वैपाक पाणी, आले गेले, मुलांच्या शाळा, नोकरी असेल तर अजूनच परीक्षा ! खूप दम छाक व्हायची रोजची कामे करतानाच. त्यातून पाहुणे येणार म्हटलं कि आनंद जेवढा व्हायचा त्याच्या दुप्पट टेन्शन यायचा कि सगळं कसं जमणार ! कुणी येणार म्हटलं कि घर छान आवरलेलं पाहिजे, नेहेमी पेक्षा वेगळं साग्र संगीत जेवण , त्याचं प्लँनिंग , त्यांना कुठे तरी फिरायला घेऊन जाणे, दिवसभराच्या चहा नाष्टा जेवण सगळ्यांचे प्लांनिंग करून तशी तयारी करणे . पाहुणे गेले कि परत घर आवरणे.  त्यातून मुले लहान. त्यांचे पण पाहणे.  

सुरुवातीला हे सगळे खूप अवघड आणि दमवणारे वाटायचे. पण हळू हळू सवय झाली. आणि एक गोष्ट लक्षात आली कि आलेले पाहुणे सुद्धा खरेच आपले घर समजून आपल्याला मदत करतात.  आल्यावरचे वेलकम जेवण सोडले तर नंतर ची साफ सफाई, आपली गरज ओळखून एखादे काम करून टाकणे, अगदी भांडी धुवायला पण मदत करणे, एखादी गोष्ट राहिली आपल्याकडून तर समजून घेणे अशी मोठी मदत करत असतात. वेळो वेळी आपण केलेल्या अगत्याचे प्रामाणिक कौतुक करून आपल्या दमवणूकी वर फुंकर घालत असतात.  

हे आज लिहायचा कारण म्हणजे मागचा आठवडा हा असाच गम्मत आठवडा होता. 

माझी बहीण आणि तिचे  कुटुंब ३ वर्षांनी आमच्या घरी आले. आम्ही खूप आतुरतेने त्यांची वाट पाहत होतो. मुलांना मुले भेटली त्यामुळे ते पण खुश ! आल्यावर बहीण लगेच मला मदत करायला लागली. तेव्हा मी तिला म्हटले कि चार दिवस माहेरपण एन्जॉय कर. लगेच कामाला उभी राहू नकोस. मस्स्त लाड पुरवून घे ! त्यावर उलट मलाच खडसावलं तिने. "तुझ्या एकटीवर कामे टाकून मी माहेरपण कशी एन्जॉय करु शकेन ? पटपट सगळ्यांनी मिळून कामे करायची आणि एकमेकांबरोबर वेळ घालवायचा. आरामच करायचा असेल तर मी हॉटेल वर राहीन कि ! तिथे कुणी मला काम कर म्हणणार नाही.  सो डोन्ट वरी!"  बरीच वर्षे अमेरिकेत राहून आलेल्या अनुभवाचे बोल होते ते! 

माझी बहीणच काय, नणंद जरी तिच्या हक्काच्या माहेरी आली तरी हेच सांगते मला! सगळ्यांनी मिळून पटकन कामे संपवून वेगळे काही तरी करू ! एकमेकांबरोबर वेळ घालवू . तेच माझे माहेरपण ! कुठेही तिची अपेक्षा नसते मी तिला माहेरी आली म्हणून सगळं हातात द्यावं आणि तिने मस्स्त आराम करावा, लाड पुरवून घ्यावेत. फक्त तिच नाही तर तिचे अहो सुद्धा कुठलीही मदत करायला मागे पुढे पाहत नाहीत. मी जावई आणि हि माझी सासुरवाडी, माझा मान, मी कशाला काम करु ? याचा लवलेशही नसतो!

भारतातून आलेली माझी मावस जाऊ, नणंद, मावस सासूबाई, तिकडे कितीही नोकर चाकर हाताशी असले तरी इथे आल्यावर  माझ्या बरोबरीने कामे करून रिकाम्या होतात! इथे कुणाची हेल्प नसते ते नं सांगता त्यांना कळते त्यामुळे कधीही टेन्शन येत नाही त्या असताना. त्यांची सून ( अर्थात माझीही) आणि मुलगा वयाने लहान असून पण घरी आले कि काय मदत करू विचारतात आणि पुढे होऊन मदत करतात सुद्धा!

बहीण येऊन परत गेली आणि त्याच दिवशी एक खूप जवळचे मित्रमैत्रीण  आणि त्यांचे कुटुंब एक दिवसा करता आले.  मध्ये त्याच्या पाहुणचाराची तयारी करायला , घर नीट नेटका करायला वेळ नव्हता त्यामुळे मला जरा टेन्शन आले. ते किती वाजता येणार म्हणून मी फोन केला तेव्हा तिने स्वतःहून मला शांत केले कि अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आताच तुमचे पाहुणे गेलेत सो साधेच काहीतरी जेवण कर. बाकी रात्री बघू ! किती हायसे वाटले तेव्हा ! त्यांच्या बरोबर तिचे आई बाबा, सासू बाई पण येणार होते. त्यांचाही खूप समंजस पणा ! कुठलीही मोठी अपेक्षा नाही कि असेच करायला हवे आणि तसेच करायला हवे.  उलट मी केलेल्या प्रत्येक गोष्टीचे त्यांनी भरभरून कौतुक केले. रात्री गप्पा टप्पा मारत झोपायला उशीर झाला आणि सकाळी खडबडून जाग आली कि आजी आजोबा चहा ची वाट पाहत असतील. आवरून खाली आले तर दोन्ही आजी शांतपणे चहा चे आधण ठेवून उभ्या होत्या. चहा साखरेचे डबे, दूध सगळे शोधून घेतले होते. मग मी टेक  ओव्हर करून त्यांना चहा कॉफी करून दिली तेव्हा माझ्याशी छान गप्पा मारल्या.  आणि लगेच स्वैपाकात काय मदत करू विचारले. तिच्या सासूबाईंनी कोबीची भाजी करणार आहे कळल्यावर लगेच कोबीचा ताबा घेतला कि मी चिरून देते तोवर तू बाकी तयारी कर. तिच्या आईने कोशिंबिरी साठी मुळा किसून दिला.  मग मैत्रिणीने पोळ्या भाजायला मदत केली. दोन्ही अहोन्नी आणि मुलांनी पाट पाणी - जेवणाची तयारी केली. जेवण झाल्यावर मागचे आवरायला मदत केली.  घरात ११ माणसे होती पण सगळ्यांनी मिळून केल्याने पटकन झाले सगळे आणि माझ्या एकटी वर ताण आला नाही ! जाताना आजी आजोबांनी भर भरून आशीर्वाद पण दिला!! 

मुलांना सगळ्यांना भेटून छान वाटले. पाहुणे गेल्यावर आम्ही हुश्श झालो पण आमच्या गप्पांमध्ये परत आमचे पाहुणेच होते :)  याचे मोठे कारण म्हणजे त्यांनी केलेले सहकार्य आणि आम्ही मनापासून केलेला पाहुणचार गोड मानून घेणे हेच होते!

उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही जसे लहानपणी मामाकडे/ मावशी कडे जायचो, कधी ते आमच्याकडे यायचे, मावस,मामे, चुलत भावंडं भेटायची, खूप खेळायचो, लाड पुरवून घ्यायचो ! आज त्याच आठवणी आठवून जसे रमतो तसेच आमच्या मुलांना अमेरिकेत पण अशाच आठवणी भर भरून मिळतात यापेक्षा दुसरे काय हवे?

अतिथी तुम कब जाओगे? ...  पेक्षा , वापस कब मिलेंगे?  असे वाटणे जास्ती भाग्याचे नाही का?













Wednesday, June 29, 2022

बाते छोटी छोटी - शब्दावाचून कळले सारे ....



काल मस्त drive करत होते .  Highway वरून exit lane मध्ये शिरायचे होते . तीच lane मागून दुसऱ्या रोड वरून highway ला merge होणारी पण होती. मागून एक कार येताना मला दिसली. अगदीच जवळ होती ती.  त्यामुळे मी आधी कि ती आधी हे कळणे गरजेचे होते. मी थोडा मागे पाहून right indicator दिले तसे त्या कार ने लेफ्ट indicator दिले. समजायचे ते समजून मी स्पीड वाढवला आणि exit lane मध्ये शिरले आणि माझ्या मागून ती कार highway ला merge झाली. 

किती सोपे ! एकही शब्द न वापरता शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले ! असे वाटून गेले क्षणभर ! नकळत मी त्या सुसाट जाणाऱ्या कार कडे बघून smile केले . 

हे नसते कळले किंवा हा कॉमन सेन्स traffic rule पाळला गेला नसता तर accident पण होऊ शकला असता. 

रोजच्या आयुष्यात पण असे होते ना नेहेमी ! आपल्या अवती भावतीच्या लोकांकडून आपण काही शब्दांच्या पलीकडले expect करत असतो. खास करून आपल्या जवळच्या व्यक्तींकडून . मग एखाद्या गोष्टीची त्यांना जाणीव होत नाही म्हणून आपले मन खट्टू होते. कधी कधी आपण सांगून सुद्धा कळत नाही तेव्हा तर विचारूच नका संवादाचे वादात रूपांतर होऊन आपला मुद्दा पटवून देण्याची जी काही शर्यत सुरु होते ! आपलाच मुद्दा कसा बरोबर हे पटवून देताना जरी जाणीव झाली कि समोरचा म्हणतो  तेही बरोबर आहे बरं का, तरीही आपलाही कसा बरोबर हे त्यालाही पटले पाहिजे ना !! मग होणार काय ? बरेच शाब्दिक accident होतात आणि बऱ्याच bhavana त्यात जीव गमावतात किंवा जखमी होतात. ज्यांचा कुठेही इलाज होणार नसतो किंवा इन्शुरन्स नसतो. 

अनोळखी लोकांबरोबर जर आपण हे कॉमन सेन्स rules पळू शकत असू तर मग जे आपल्या जवळचे आहेत त्यांच्या बरोबर सुद्धा ते लागू केले तर शब्दांच्या पलीकडले अजूनच दृढ होतील ना !! 


Thursday, June 10, 2021

बाते छोटी छोटी -२


खूप दिवसांपासून हा विषय मनात होता. पण आज लिहावेसे वाटले याला कारण मी पण तीच चूक केली !!


नाही नाही !! 😀!!खूप मोठी वाटेल अशी नाही पण मनाला न पटणारी एक गोष्ट केली !!😔😔

या वर्षी आम्ही घरात एक ठराव पास केला कि कुणीही घरी येणार असेल त्यांना आगाऊ (?)सूचना द्यायची कि मुलांसाठी चोकोलेट्स आणू नका . त्याला कारणही तसेच होते कि बऱ्याच वेळा लोक घाई घाई मध्ये येतात आणि आणायला सोपे , मुलांना आकर्षक असे मोठे मोठे चोकोलेट्स चे पॅकेट्स घरात येऊन पडतात. मग सारखे मुलांना कंट्रोल करावे लागते कि सारखे चोकोलेट्स खाऊ नका. 

ते पॅकेट्स  परत कुणाला भेट देणं  मनाला पटत नाही . त्यापेक्षा आणूच नका सांगितलं तर हळू हळू कळेल  लोकांना आणि समजून घेतील ते  नक्कीच !

खूप लोकांनी आमचा हा  'आगाऊ'  पणा  समजून घेतला आणि आमच्या विनंतीचा मान ठेवला. 

पण चकोलेट्स शिवाय अजूनही बऱ्याच गोष्टी आणणे आणि दुसऱ्यांच्या मुलांना देणे टाळले पाहिजे असे सतत मला वाटत राहिले. 

परवा  एक जण भेटायला आले . ते खूप जवळचे नव्हते त्यामुळे त्यांना आम्ही आगाऊ सांगू शकलो नाही  आणि त्यांनी पण अजाणतेपणी नेमकेबेकरी  स्वीट्स चे दोन मोठे पॅकेट्स आणले मुलांसाठी.  ते नाकारणे पण जमले नाही आम्हाला. एवढे मोठे पॅकेट्स आपण कसे संपवणार असा प्रश्न पडला !!

मग काय !!आम्हाला पण जायचेच होते २ ठिकाणी !

एक एक पॅकेट त्यांना देऊन टाकले !!! हुश्शा! घरातले पॅकेट्स तर गेले !

पण.... 

मनातले पॅकेट्स गेले नाहीत !!

जे मी माझ्या मुलांना खाऊ  घालणार नाही ते दुसऱ्यांच्या मुलांना देण्याची चूक मी केली जी माझ्याच तत्वाच्या विरुद्ध  होती ! म्हणून confession म्हणा किंवा माझ्या बरोबर इतरांनी पण हा विचार करावा यासाठी हा लेखन प्रपंच !

मी कितीही घाईत असले तरी दुसऱ्यांच्या मुलांना काही आणताना त्यांना ते उपयोगी पडेल का याचा कटाक्षाने विचार करते! आणि म्हणूनच माझेच मन मला खात राहिले. 

आजकाल प्रत्येक जण खाते पिते घर का असतो !! किंबहुना जास्तीच खात पीत असतो :)

त्यामुळे कुणाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये हे खरे असले तरी बळेच काही पण नेऊ नये हेही  महत्वाचे !

मध्ये माझ्या मुलाच्या वाढ दिवसाला अशाच एका साधन कुटुंबाने ओपन केलेले आणि नं  चालणारे खेळणे गिफ्ट दिले. तेव्हा वाईट वाटले कि नसतेच दिले तरी चालले असते ना?

खूप वेळा असे अनुभव येतात कि काही गोष्टी बळेच पास केलेल्या असतात . 

बाकी गोष्टींचे जाऊ देत... पण जेव्हा गोष्ट मुलांच्या आरोग्याची असते तेव्हा हा विचार व्हायलाच हवा !

काय देऊ शकतो आपण ?

- मुलांना घरी बनवलेला एखादा पौष्टिक खाऊ, ड्राय फ्रुटस, फ्रेश फ्रुटस, healthy snacks

- त्यांच्या वयाला साजेसे छोटेसे खेळणे, एखादा डोक्याला खाऊ असलेला game ?

- सहज जमेल अशी activity 

- वयाला  साजेसे छोटेसे पुस्तक?

- खेळताना वापरता येईल अशी एखादी वस्तू?


पर्याय खूप आहेत ! थोडासा विचार हवा !

काहीच नाही जमले तर आपला थोडासा वेळ !!

वेळे वरून आठवलं !

मागे आमचे खूप जवळचे मित्र कुटुंब भेटायला आले होते.

त्यांनी आल्या आल्या आधी मुलांशी संवाद साधला . मुलांना पत्ते  खेळायला दोन नवीनडाव  शिकवले. 

छोट्या मुलाशी त्याच्या सारखाच छोटा होऊन मस्ती केली ! त्याचे कौतुक केले !

मुलं खुश! आमच्याशी पण गप्पा टप्पा झाल्याच ! पण ते गेल्या नंतर पण आम्ही रोज ते game खेळताना त्यांची आठवण काढत होतो !

आपण पण असे करू शकतो अशी नकळत शिकावण आम्हाला पण मिळाली :)


कुठे तरी हे छोटे बदल घडायला हवेत ! आपली मुलं काय किंवा दुसऱ्याची काय ! काळजी सगळ्यांचीच घ्यायला हवी :)


आहे कि नाही ?बात छोटीसी मगर सोच नयी ?

ता. क . - वरील पर्यायांमध्ये अजून काही नक्कीच सुचवू शकता !







Thursday, March 26, 2020

इंग्लिश विंग्लिश !!! भाग -१!




गेले २ आठवडे इंग्लिश विंग्लिश ची श्रीदेवी असल्यासारखा वाटतंय !!! बऱ्याच काळापासून मनात असलेला "योग शिक्षक " अभ्यासक्रम पूर्ण करायचा स्वप्न सत्यात उतरत होतं ! स्वतःलाच किती वेळा चिमटे काढायची इच्छा होत होती !! हे खरंच घडतंय याचा विश्वास बसत नव्हता !

 दोन वर्षांपूर्वी या अभ्यासक्रमाला रजिस्टर केले होते. पण जॉब  आणि बाकी कामांमुळे अभ्यास करायला मुहूर्त लागत नव्हता. प्रॅक्टिकल ला जाण्यापूर्वी अभ्यास पूर्ण करून  सगळ्या assignment पाठवायच्या होत्या आणि त्याची मुदत संपत आली होती. शेवटी मानाने  उचल खाल्ली आणि जॉब ला राम राम ठोकून बैठक मारून बसले. कारण त्याशिवाय वेळ मिळणं अवघड होतं. 'कुछ  पाने  के लिये , कुछ खोंना पडता है ' नियमानुसार मनाची समजूत घातली आणि तयारीला लागले. सकाळी लवकर उठून , मुलं शाळेत गेली की  , रात्री मुलं झोपली की  वेड्यासारखी वाचत होते. खूप वर्षांनी डोक्याला ताण मिळाल्याने सुरुवातीला अवघड वाटले . पण मग सवय झाली. अभ्यास केल्याचे एक वेगळेच समाधान मिळत गेले . ही  सगळी प्रक्रिया आवडायला लागली.

घरातही सगळे मला जमेल ती मदत करायला सरसावले. सकाळी बाबा (सासरे) लवकर उठले की मला रिंग देऊन उठवायचे. "अभ्यास करायचा आहे ना? "  मुलांना बजावायचे, " आई अभ्यास करते आहे, तिला त्रास देऊ नका !" आई (सासूबाई)  घरातली वरची काम माझ्यावर पडणार नाहीत याची खबरदारी घ्यायच्या. त्याही रोज सकाळी योगासने करत असल्यामुळे आमच्या चर्चा पण व्हायच्या काही नवीन वाचण्यात आले की .
मुलांसाठी तर आई अभ्यास करतेय हे एक नवलच  होतं. कारण ऐरवी अभ्यास त्यांनी करायचा असतो एवढंच
त्यांना माहिती होतं. आणि मग तेही शहाण्यासारखं मला वाचू देत ( आणि आपल्याला मिळणारे स्वातंत्र्य enjoy करत :) ) कधी कधी कंटाळून कधी संपणार तुझा अभ्यास असा तगादा पण लावत : ) कारण ऐरवी त्यांना मिळणारे संपूर्ण लक्ष कमी झाले होते. पण आजी आजोबा दुसरी बाजू उचलून धरत होते ! अमेरिकेतून अहो सुद्धा सतत देखरेख ठेवून प्रोत्साहन देण्याचे काम करत होतेच ! त्यामुळे अभ्यास पार पडला .  सगळ्या assignment पूर्ण करून पाठवून दिल्यावर हुश्शा केले !

आता वेळ आली प्रॅक्टिकल साठी रजिस्टर करायची. त्यासाठी लोणावळ्याला २ आठवडे राहायला जावे लागणार होते. मुलांना सोडून जायचे या कल्पनेने चलबिचल चालू होती. अशा वेळी एकदा कोपऱ्यावर मैत्रीण भेटली.
डोक्यात चालू असलेली द्विधा मनस्थिती तिला सांगितली. आणि तिने लग्गेच मला शांत केले !
"जा आणि कोर्स पूर्ण करून ये ! मुलांना बघायला आम्ही सगळे आहोत . काळजी करू नकोस !" किती बरं वाटलं एवढ्या एका वाक्याने ! बाकीच्याही मैत्रिणींनी सांगितले कि आम्ही अर्जुन ला खेळायला घेऊन जात जाऊ. काळजी करू नकोस. त्यामुळे परत उभारी धरून रजिस्टर केले .
उशिरा रजिस्टर केल्याने तिथे राहायची सोया होणार नव्हती. बाहेर हॉटेल मध्ये राहावे लागणार होते. पण एकटीने हॉटेल मध्ये राहायला  बरोबर वाटत नव्हते. आजकालच्या बातम्या वाचून मनात दडलेली भीती बाहेर येत होती . सगळ्यांनाच काळजी होती. मग आई बाबांनी जवळच्या नातेवाईकाकांना सांगून त्यांच्याकडे राहायची सोय केली ! एक काळजी मिटली ! ऑफिस मधली  एक मैत्रीण highway ला राहते. गरज पडली तर
माझ्या घरी  बिनधास्त ये राहायला असे मनमोकळे आमंत्रण दिले. तोही एक  option होता.

 आई बाबांबरोबर माझ्याही आईला बोलावलं रहायला.
आधी  आई बाबांची नर्मदा परिक्रमा त्याच वेळेस ठरलेली होती . तेव्हा (अगं ) आई ने दोन्ही मुलांना १५ दिवस सांभाळेन असं मला आश्वासन देऊन पाठिंबा दिला . या वयात तिने एकटीने दोघांना सांभाळणं तिच्यासाठी खूप challenging होतं तरीही !!! इकडे आई बाबांची पण ट्रिप कॅन्सल करायची  तयारी चालू होती . आणि  खरेच पुरेसे बुकिंग्स ना मिळाल्याने ट्रिप रद्द झाली !!! आणि आम्ही सगळेच हुश्श झालो . आता अहो आई बाबा  आणि अगं आई तिघंही मुलांबरोबर असणार होते त्यामुळे थोडे टेंशन कमी झाले . माझ्याहीपेक्षा या तिघांचा निर्धार ठाम होता मी कोर्से पूर्ण करावा म्हणून !!

आज्जी येणार म्हणून मुलं काय काय प्लॅन करण्यात मग्न होती. त्यामुळे  मी जरा निवांत झाले. 
सतत मुलांना बजावत होते , "मी नसताना असं  करा,  तसं करू नका " वगैरे . नक्की कळत  नव्हतं की ,  मी त्यांची तयारी करतेय की  स्वतःला समजावतेय !
निघायच्या दिवशी सगळी तयारी करून निघताना मुलं चिकटून बसली. शेवटी निघालेच. मोठ्यांचा आशीर्वाद घेतला . शेजारच्या काकूंनी पण तोंडभर आशीर्वाद दिला , 'यशस्वी होऊन ये '. शब्दात किती ताकद असते ते जाणवलं ! 

 आधी २ वेळा लोणावळ्याला  ड्राईव्ह करून गेले होते प्रॅक्टिस म्हणून. तेव्हा सगळे बरोबर होते. पण आता एकटीला जायचं होतं. सुरुवातीला उगीच दाटून आलेली भीती हळू हळू दूर झाली . highway वर गाडी मस्स्त पाळायला लागली.
एक वेगळीच जाणीव होत होती . आपण वेगळं काहीतरी करायला जातोय या निर्धाराने एक वेगळेच बळ आले.
कितीतरी वर्षांनी अशी एकटी बाहेर पडले होते. कैवल्यधाम ला पोहोचून सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या.
कोरोना च्या उद्रेका मुळे परदेशातून येणारे बरेच लोकं गळाले होते. त्यामुळे माझी कैवल्य धाम मधेच राहायची सोय झाली.  घरी सगळे  निर्धास्त  झाले !
त्या नंतर कैवल्यधाम मधले जे सुखद अनुभव आले त्यावर एक वेगळी पोस्ट लिहिणार आहेच.
रोजचे प्रॅक्टिकल्स , lecture, परीक्षा आणि प्रेसेंटेशन ची तयारी यात एक एक दिवस छान जात होता.
वेळ मिळाला  की घरी व्हिडिओ कॉल  करून आजी आजोबा आणि मुलांशी बोलत होते.  घरी दोन्ही आज्ज्या आणि आजोबा खिंड लढवत होते. मैत्रिणी पण अर्जुनला खेळायला नेत  होत्या .

एक आठवडा संपला आणि पुण्यात कोरोनामुळे लॉक डाउन जाहीर झाले.  तशी मला या सगळ्यांची काळजी वाटायला लागली. तेव्हा कोर्स पूर्ण करूनच ये असा ठामपणे सांगणाऱ्या आजी आजोबांचे मला खूप कौतुक वाटले . त्यामुळे मी शांतपणे लक्ष देऊ शकत होते. कोर्स मधल्या घडामोडी , गमती जमती सगळ्यांना रोज सांगत होते. अहो सुद्धा अमेरिकेतून रोज सकाळी मी उठले कि नाही याची खात्री करत होते. माझा good morning message किंवा कॉल आला नाही की लगेच कॉल यायचा. कारण रोज सकाळी ६.३० ला प्रॅक्टिकल असायचे . मध्ये मध्ये दोन्ही बहिणी, वन्स  बाई , मैत्रिणी  फोन करून माझी खबरबात घेत होत्या .
असे लाड करून घ्यायला खूप छान वाटत होते .

आज सगळ्या परीक्षा पूर्ण झाल्या. उद्या सकाळी समारोप समारंभ करून घरी परत जाणार !
एक स्वप्न पूर्ण केल्याचे वेगळेच समाधान वाटते आहे ! पण हे पूर्ण करताना घरच्यांनी घेतलेली काळजी , मैत्रिणींनी दिलेला आश्वासक आधार , मुलांनी दाखवलेला समजूतदारपणा, एवढं  बळ माझ्या पाठीशी होतं !
सगळा देश कोरोना मुळे बंद झाला तरी आमचा कोर्स चालू राहीला ! हे याच आशीर्वादांचं आणि शुभेच्छांचं फळ!!
एखादी गोष्ट मनापासून करायची इच्छा असेल तर मार्ग मिळत जातात याची प्रचिती आली !!

याहून वेगळं भाग्य ते काय असतं ??




भाग -२... लवकरच ....
(नक्की इंग्लिश विंग्लिश का वाटलं ... )




 

Wednesday, May 19, 2010

I Love my cycle :)

लहानपणी आकर्षण वाटणारी सायकल! थोडे मोठे झाल्यावर शाळेत जायला हातात मिळाली :) मोठ्या बहिणीची ATLAS सायकल!आजीच्या वाड्यातल्या मैत्रिणीने, दीप्तीने सायकल चालवायला शिकवली :) शिकताना आधी नुसताच एक पाय paddle वर आणि दुसरा पाय जमिनीवर, मग हळूच दुसराही पाय paddle वर टाकून अर्धे paddle मारत तोल सांभाळणे, कधीतरी पहिल्यांदा धाडस करून मारलेला पहिला पूर्ण paddle , मग धिटाई वाढून आधी अंगणात आणि मग रस्त्याच्या कडेने मारलेल्या चकरा!! कधी धड्पले तरी उठून परत सायकल शिकायची उर्मी, मग लहान बहिणीला मागे बसवून " double seat " , शाळेत जाताना मैत्रिणींबरोबर लावलेली सायकल शर्यत !!...कित्ती आठवणी सायकलच्या :)

कॉलेजला गेल्यापासून scooty ,activa भुरळ घालायला लागल्या, मोठ्या शहरात घर आणि college अंतर मोठे, मग सायकल मागेच पडली. कधी आठवण पण नाही आली तिची :(

लग्नानंतर अहोंच्या वाढदिवसाला surprise गिफ्ट म्हणून ६ गेअर्स ची सायकल दिली :)घरात सायकल नव्हती. मग शेंडेफळ असल्यासारखा तिचा कौतुक वाटत राहिलं :) पण ते तेवढ्यापुरताच :( रोजच्या धावपळीत नंतर ती धूळ खात पडली:(
जवळ जवळ ३-४ वर्षांनी थोडा व्यायाम तरी होईल म्हणून तिला दुकानात नेऊन ठीक ठाक करून आणलं.आणि एका सकाळी मस्तं सायकल वर स्वार होऊन फिरायला गेले!! चढावरून जाताना दमछाक झाली पण तो आनंद वेगळाच होता :) जाताना दमछाक होणे, येताना उतारावरून paddle नं मारता सुर्र्रर्रर्र्र्र करत येणे, गार गार वारा, तोही कुठलेही प्रदूषण नं करता, पेट्रोल नं जाळता आणि CALARIES जाळता जाळता :)

परवा एक छान गोष्टं दिसली. आई बाबा २ सायकल वर २ बाजूंनी आणि त्यांची छोटीशी मुलगी छोट्याश्या सायकल वर त्यांच्या मधून मजेत फिरायला चालले होते :)

आता मी आठवड्यातून २-३ वेळा तरी सायकल वर फिरायला जाते सकाळी :) माझा हा उत्साह असाच टिकेल असा आता मलाच विश्वास वाटतोय. म्हणून लिहायचा धाडस केलं :)माझ्यासारखी थोड्या फार फरकाने प्रत्येकाचीच सायकल गोष्टं असणार. पण हे वाचून कुणाला सायकल चालवायची इच्छा झाली तर JOIN ME :)

फिरायला जाण्याव्यतिरिक्त जवळची कामं करायला सायकल वापरली तर प्रदूषणात आणि तब्येतीत किती फरक पडेल ;-? मी हे अजून सुरु केले नाहीये. केल्यावर कळवेनच :)
तूर्तास "चला सायकलस्वार व्हा :)"