अमेरिकेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या २ महिने तरी असतात. शाळांना सुट्ट्या असल्याने आणि हवामान चांगले असल्याने बरीच मंडळी प्रवास करतात. कधी मित्रांना / नातेवाईकांना भेटायला तर कधी पर्यटन म्हणून. साहजिकच जून / जुलै म्हणजे पाहुणे आणि पाहुणचार चा सुकाळ!
इथे लोकं लांबून येतात त्यामुळे शक्यतो मुक्काम करणे भाग असते. ऐरवी भेटणे होत नाही त्यामुळे सगळे जण एकमेकांच्या भेटी ची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. खूप प्रेमाने आणि हक्काने घरी येतात. आपण गेलो कि आपलाही पाहुणचार असाच प्रेमाने आणि अगत्यानं करतात. एवढ्या मोठ्या देशात आपली माणसं आहेत हि जाणीव खूप मोलाची असते!
भारतातून अमेरिकेत आले तेव्हा मला हे सगळं नवीन होतं. इथे सगळी कामं घरी करायची, घराची साफ सफाई, स्वैपाक पाणी, आले गेले, मुलांच्या शाळा, नोकरी असेल तर अजूनच परीक्षा ! खूप दम छाक व्हायची रोजची कामे करतानाच. त्यातून पाहुणे येणार म्हटलं कि आनंद जेवढा व्हायचा त्याच्या दुप्पट टेन्शन यायचा कि सगळं कसं जमणार ! कुणी येणार म्हटलं कि घर छान आवरलेलं पाहिजे, नेहेमी पेक्षा वेगळं साग्र संगीत जेवण , त्याचं प्लँनिंग , त्यांना कुठे तरी फिरायला घेऊन जाणे, दिवसभराच्या चहा नाष्टा जेवण सगळ्यांचे प्लांनिंग करून तशी तयारी करणे . पाहुणे गेले कि परत घर आवरणे. त्यातून मुले लहान. त्यांचे पण पाहणे.
सुरुवातीला हे सगळे खूप अवघड आणि दमवणारे वाटायचे. पण हळू हळू सवय झाली. आणि एक गोष्ट लक्षात आली कि आलेले पाहुणे सुद्धा खरेच आपले घर समजून आपल्याला मदत करतात. आल्यावरचे वेलकम जेवण सोडले तर नंतर ची साफ सफाई, आपली गरज ओळखून एखादे काम करून टाकणे, अगदी भांडी धुवायला पण मदत करणे, एखादी गोष्ट राहिली आपल्याकडून तर समजून घेणे अशी मोठी मदत करत असतात. वेळो वेळी आपण केलेल्या अगत्याचे प्रामाणिक कौतुक करून आपल्या दमवणूकी वर फुंकर घालत असतात.
हे आज लिहायचा कारण म्हणजे मागचा आठवडा हा असाच गम्मत आठवडा होता.
माझी बहीण आणि तिचे कुटुंब ३ वर्षांनी आमच्या घरी आले. आम्ही खूप आतुरतेने त्यांची वाट पाहत होतो. मुलांना मुले भेटली त्यामुळे ते पण खुश ! आल्यावर बहीण लगेच मला मदत करायला लागली. तेव्हा मी तिला म्हटले कि चार दिवस माहेरपण एन्जॉय कर. लगेच कामाला उभी राहू नकोस. मस्स्त लाड पुरवून घे ! त्यावर उलट मलाच खडसावलं तिने. "तुझ्या एकटीवर कामे टाकून मी माहेरपण कशी एन्जॉय करु शकेन ? पटपट सगळ्यांनी मिळून कामे करायची आणि एकमेकांबरोबर वेळ घालवायचा. आरामच करायचा असेल तर मी हॉटेल वर राहीन कि ! तिथे कुणी मला काम कर म्हणणार नाही. सो डोन्ट वरी!" बरीच वर्षे अमेरिकेत राहून आलेल्या अनुभवाचे बोल होते ते!
माझी बहीणच काय, नणंद जरी तिच्या हक्काच्या माहेरी आली तरी हेच सांगते मला! सगळ्यांनी मिळून पटकन कामे संपवून वेगळे काही तरी करू ! एकमेकांबरोबर वेळ घालवू . तेच माझे माहेरपण ! कुठेही तिची अपेक्षा नसते मी तिला माहेरी आली म्हणून सगळं हातात द्यावं आणि तिने मस्स्त आराम करावा, लाड पुरवून घ्यावेत. फक्त तिच नाही तर तिचे अहो सुद्धा कुठलीही मदत करायला मागे पुढे पाहत नाहीत. मी जावई आणि हि माझी सासुरवाडी, माझा मान, मी कशाला काम करु ? याचा लवलेशही नसतो!
भारतातून आलेली माझी मावस जाऊ, नणंद, मावस सासूबाई, तिकडे कितीही नोकर चाकर हाताशी असले तरी इथे आल्यावर माझ्या बरोबरीने कामे करून रिकाम्या होतात! इथे कुणाची हेल्प नसते ते नं सांगता त्यांना कळते त्यामुळे कधीही टेन्शन येत नाही त्या असताना. त्यांची सून ( अर्थात माझीही) आणि मुलगा वयाने लहान असून पण घरी आले कि काय मदत करू विचारतात आणि पुढे होऊन मदत करतात सुद्धा!
बहीण येऊन परत गेली आणि त्याच दिवशी एक खूप जवळचे मित्रमैत्रीण आणि त्यांचे कुटुंब एक दिवसा करता आले. मध्ये त्याच्या पाहुणचाराची तयारी करायला , घर नीट नेटका करायला वेळ नव्हता त्यामुळे मला जरा टेन्शन आले. ते किती वाजता येणार म्हणून मी फोन केला तेव्हा तिने स्वतःहून मला शांत केले कि अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आताच तुमचे पाहुणे गेलेत सो साधेच काहीतरी जेवण कर. बाकी रात्री बघू ! किती हायसे वाटले तेव्हा ! त्यांच्या बरोबर तिचे आई बाबा, सासू बाई पण येणार होते. त्यांचाही खूप समंजस पणा ! कुठलीही मोठी अपेक्षा नाही कि असेच करायला हवे आणि तसेच करायला हवे. उलट मी केलेल्या प्रत्येक गोष्टीचे त्यांनी भरभरून कौतुक केले. रात्री गप्पा टप्पा मारत झोपायला उशीर झाला आणि सकाळी खडबडून जाग आली कि आजी आजोबा चहा ची वाट पाहत असतील. आवरून खाली आले तर दोन्ही आजी शांतपणे चहा चे आधण ठेवून उभ्या होत्या. चहा साखरेचे डबे, दूध सगळे शोधून घेतले होते. मग मी टेक ओव्हर करून त्यांना चहा कॉफी करून दिली तेव्हा माझ्याशी छान गप्पा मारल्या. आणि लगेच स्वैपाकात काय मदत करू विचारले. तिच्या सासूबाईंनी कोबीची भाजी करणार आहे कळल्यावर लगेच कोबीचा ताबा घेतला कि मी चिरून देते तोवर तू बाकी तयारी कर. तिच्या आईने कोशिंबिरी साठी मुळा किसून दिला. मग मैत्रिणीने पोळ्या भाजायला मदत केली. दोन्ही अहोन्नी आणि मुलांनी पाट पाणी - जेवणाची तयारी केली. जेवण झाल्यावर मागचे आवरायला मदत केली. घरात ११ माणसे होती पण सगळ्यांनी मिळून केल्याने पटकन झाले सगळे आणि माझ्या एकटी वर ताण आला नाही ! जाताना आजी आजोबांनी भर भरून आशीर्वाद पण दिला!!
मुलांना सगळ्यांना भेटून छान वाटले. पाहुणे गेल्यावर आम्ही हुश्श झालो पण आमच्या गप्पांमध्ये परत आमचे पाहुणेच होते :) याचे मोठे कारण म्हणजे त्यांनी केलेले सहकार्य आणि आम्ही मनापासून केलेला पाहुणचार गोड मानून घेणे हेच होते!
उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही जसे लहानपणी मामाकडे/ मावशी कडे जायचो, कधी ते आमच्याकडे यायचे, मावस,मामे, चुलत भावंडं भेटायची, खूप खेळायचो, लाड पुरवून घ्यायचो ! आज त्याच आठवणी आठवून जसे रमतो तसेच आमच्या मुलांना अमेरिकेत पण अशाच आठवणी भर भरून मिळतात यापेक्षा दुसरे काय हवे?
अतिथी तुम कब जाओगे? ... पेक्षा , वापस कब मिलेंगे? असे वाटणे जास्ती भाग्याचे नाही का?
