Friday, March 26, 2010

रंग वसंताचे!

तसे मला प्रत्येक ऋतू मध्ये काही ना काही आवडते :) गुलाबी थंडी मधली रजई गुरफटलेली रात्र आणि सकाळ , हवीहवीशी वाटणारी उबदार दुपार! -

पावसाळ्यातले धुंद कुंद वातावरण :) सर सर सरी, ढगांचा आवाज, कडकडणारी वीज, हिरवी हिरवी झाडं, डोंगरांवरून कोसळणारे झरे (पावसाळा माझा सर्वात लाडका ऋतू :)...त्याबद्दल लिहीन तेवढं कमीच !) ...आणि आत्ता चालू असणारा उन्हाळा - वसंत ऋतू!!



हल्ली रोज साधारण सकाळी ६ च्या सुमारास सूर्य नारायणाचे आगमन होते :) हलकासा उजेड निव्वळ १५ - २० मिनिटांमध्ये सगळं आकाश उजळवून टाकतो!! एक अनोखं चैतन्य चराचरामध्ये भरून जातं !! एवढ्याश्या वेळातही आकाशातले रंग किती वेगाने आणि नकळत बदलत जातात! आधी रात्रीचा काळा रंग हळू हळू निळा होता जातो...मग स्वच्छ पांढरा जणू काही सूर्य नारायणाला आकाशाच्या पटावर चित्र काढण्याची रोज लहर येते :) क्षितिजावर हळू हळू तांबडा गुलाबी रंग- सोनेरी चमकणारे ढग असा मन मोहवून टाकणारं दृष्य!! आणि मग दिवसाला खरी सुरुवात होते.
एक प्रसन्न सकाळ - दिवसभराची लाही सोसता यावी याची तयारी !!!
दुपार मात्र मला फारशी आवडत नाही :(
संध्याकाळी परत उतरती उन्हं वेगळेच रंग घेऊन साथीला येतात. थकल्या भागल्या सूर्य देवाला आणि चराचराला शांत करण्यासाठी!
यात अजून सौंदर्य भरण्यासाठी की काय...निसर्ग राजा अगणित फुलांनी नटून थटून बसतो :)
अगणित झाडांवर अगणित रंगांची फुलं, फळं, फळांचे मोहोर वेडावून टाकणारे सगळे काही :)


आजकाल रोज संध्याकाळी ऑफिस च्या बस ने घरी जाताना हिंजवडी मधल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बोगन वेल आपल्या सौंदर्याने बहरून हसत असते :)बरयाच वेळा बंगल्यांच्या कुम्पानांवर सुद्धा !! किती किती रंग असतात तिचे ? पांढरा, गुलाबी, पिवळा, अबोली!!! हिच्या वेलीला कुठलेही वळण नाही...आकाराचे बंधन नाही!! अनेक रंगांचे कारंजे फुटल्या सारख्या हिच्या फांद्या अस्ताव्यस्त वाढत असतात...भरभरून फुलं अंगावर खेळवत असतात! तिच्या या अनिर्बंध सौंदर्याची मी रोज मनात दृष्ट काढते :) थोडा हेवाच वाटतो मला तिचा :)







एव्हाना फळांचा राजा कुठे मोहरलेला दिसतो तर कुठे त्याची आंबट गोड कैरी झालेली असते ..कुठल्याही रुपात हा सुंदरच दिसतो :) आपल्या गर्द हिरव्या पानांमध्ये विराजमान होऊन आपल्या मनावर राज्य करायला तयार!!!


अचानक कुठेतरी सोनसळी बहावा मोहक पिवळ्या रंगाची उधळण करताना दिसतो! हिरवी पाने कधीची हरवलेली असतात.उरतात फक्त पिवळी फुले :) याला बघण्यात मी दिवसच्या दिवस घालवू शकेन असे वाटत राहते. मला मंत्रमुग्ध करून टाकते त्याचे पिवळेपण :)याला "सुवर्णिका" म्हणतात हे मला आत्ताच कळलं :)





गुलमोहोर पण लाल, पिवळ्या,फिकट जांभळ्या रंगांची फुले घेऊन स्पर्धेत उतरतो :) वारयावर हलके हलणारी तलम पानं आणि असंख्य फुलं!!





चाफ्याला कसे विसरता येईल? पांढरा, लाल चाफा टपोरी कर्णफुले शांत आणि मंद मंद मिरवत असतो :) घराजवळच्या चाफ्याचा एक तरी फुल मिळतंय का याची आम्ही जाता येता वाट पाहत असतो :) त्याचा शांत रंग आणि मंद सुवास देवघरातल्या अत्तराचीच आठवण करून देतो :)

छोटी छोटी फुलझाडं तरी कशाला मागे राहतील?




मोगरा, जाई, शेवंती, जास्वंद, अबोली, कण्हेर, गुलाब, झेंडू, निशिगंध,सोनचाफा, सदाफुली आणि हजारो शोभेची झाडं ज्यांची मला तरी नावं ठावूक नाहीत आपापले सौंदर्य खुलवत असतात :)






एकूणच चैत्र गौरी बरोबर येणारा वसंत ऋतू सौंदर्याची लयलूट करून माहेरवाशी गौरीचे सगळे लाड पुरवत असतो :) आणि आपल्या डोळ्यांचे पारणे फेडत असतो :)






आपल्याला निसर्गाची केवढी साथ आहे याची जाणीव हे सौंदर्य पाहिल्यावर आल्याशिवाय राहत नाही. गरज वाटते ती फक्त आपल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांची! आपल्या पैकी प्रत्येकाने एक का होईना असे सुंदर झाड घराजवळ लावले तर आपला परिसर आपोआपच स्वर्ग- सुंदर होईल! ..हो ना?

1 comment:

  1. लेख खुपच सुंदर ... वसंता सारखाच.... एवढी सगळी फुले पाहून मन मोहरून गेले आहे :)
    खरच.. मार्च महिना म्हणजे अंगाची लाही लाही.. असेच आठवत राहते पण ही एवढी सगळी फुलेही असतात सोबतीला याची आताच जाणीव झाली..

    वसंताच्या रंगी रंगुनी प्राजक्ता..
    फुलाफुलातुनी सुगंधातूनी
    दावी सर्वा आनंद वाटा...

    दूर देशी माय देशातल्या वसंताला भेटवल्याबद्दल खूप सारे धनस्... सांगते आता इकडच्या spring ला असेहि फुलायचे असते..:)

    ReplyDelete