
कुणीतरी म्हटलं आहे की आई , बाबा आपल्यासाठी काय असतात हे आपण स्वतः आई / बाबा झाल्याशिवाय कळत नाही. मलाही याचा अनुभव मी स्वतः आई झाल्यावर आला :) माझ्या पिल्लू चे लाड करताना, "अरे बापरे, आपल्या आई बाबांनी आपल्यासाठी हे सगळं किती नकळत केलं !" याचा प्रत्यय येत गेला. आणि आपण त्यांना नेहेमी किती गृहीत धरतो याची जाणीव झाली.
माझे बाबा ११ नोव्हेंबर २००८ रोजी गेले. त्यादिवशी फक्त त्यांना आम्ही डोळेभरून पाहून घेत होतो. बाबा असताना जितके जाणवले त्यापेक्षा ते नसताना जास्ती जाणवत आहेत!! आम्हाला वाढवताना त्यांनी ज्या छोट्या छोट्या गोष्टी अगदी मनापासून केल्या त्यांचा अर्थ खरेच किती मोठा होता हे आता जाणवते आहे.
मधेच एखादी गोष्ट आठवते आणि बाबांच्या खूप सऱ्या आठवणी येतात. त्यांच्यात बाबांना परत भेटल्याचे वेगळेच समाधान असते :)
लहानपणी आम्ही तिघी मुली म्हणून वाईट वाटून घेताना मी कधीच त्यांना पाहिलं नाही ...उलट ते कधी मजेत तर कधी अभिमानाने म्हणायचे ,"हे माझे ३ लाख आहेत!" :) आणि आम्हाला त्या वाक्याची खूप मजा वाटायची :) .त्यांच्यासाठी आम्ही खूप विशेष आहोत याची जाणीव ते आम्हाला हळूच करून देत.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही अंगणातल्या जिन्यावर बसून बाबा ऑफिस मधून यायची वाट पाहायचो. लांबवर बाबांच्या लुना चा लाईट दिसायचा आणि जवळ आले की बाबा मिश्कील पणे हॉर्न वाजवून गेट उघडा असे सुचवायचे. ती वाट पाहताना आणि लांबून येणारी गाडी बाबांची आहे की नाही याचा तर्क करताना एकदम मजा यायची :)
कधी शाळेला बुट्टी मारून घरी बसलो तर बाबा अंघोळ घालण्यापासून सगळं मनापासून करायचे.आणि मग कानात तेल घातलंच पाहिजे याचा अट्टाहास करायचे. मग आमचा आरडा ओरडा !!! ...मग हट्ट करून आम्ही त्यांच्या बरोबर ऑफिसमध्ये जायचो आणि व्रीन्दावन हॉटेल मध्ये इडली सांबर खायचो :)
आमचे घर गावाबाहेर असल्याने बाहेरची कामं बाबा एकदम मनापासून करायचे.गावातून भाजी /किराणा आणणे , आम्हाला शाळेत घ्यायला येणे ...गाडीवर कितीही लांब जायला सांगा ते नेहेमी तयार !!
फिरण्याची त्यांना खूप आवड होती. आपण भारतातली कुठली ठिकाण पहिली हे ते अभिमानाने सांगत.वैष्णव देवीला जायची इच्छा मात्र अपुरीच राहिली !!!
गणपतीच्या दिवसात आम्ही बाबांबरोबर जाऊन गणपाती आणायचो.आरती करायचो.मग विसर्जनाला पण आम्ही बाबांच्या मागे मागे हजर !!
सिनेमा पाहणे हे त्यांची अजून एक आवड !! त्यासाठी केबल घेतली होती घरी.फायटिंगचे सिनेमा त्यांना खूप आवडायचे.एखादा सिनेमा पहायचा ठरले की न पाहता परत यायचे नाही!!!
उन्हाळ्याच्या रात्री गच्चीवर झोपलो की बाबांना येणारी हातींम ताईची गोष्ट आम्ही १०० वेळा तरी ऐकली असेल :)ती रंगवून रंगवून सांगताना त्यांनाच खूप मजा वाटायची :)आणि हो आली बाबा चाळीस चोर सुध्धा !!
सुट्टीत कॅरम , पत्ते , सापशिडी , व्यापार असे सगळे खेळ ते आमच्या बरोबर खेळायचे.
गाडी चालवायला येत नसताना मला स्कूटर त्यांनीच शिकवली ..."हि स्कूटर ...अशी चालू करायची,हा ब्रेअक ...हे गेअर्स , हा क्लच, असे असे वापरायचे.." असे सांगून गाडी हातात देऊन बाबा लांब जाऊन उभे राहत ...मग पडा, झडा आणि शिका!!! गाडीला काही होईल आणि या मुली आहेत म्हणून त्यांनी गाडी शिकू नये असे त्यांनी कधीच केले नाही. त्यामुळेच आता आम्ही तिघी बहिणी कार सुद्धा आत्मविश्वासाने चालवतो :)
आंब्याच्या दिवसात आंब्याची पेटी आणणे आणि तो कसा हापूस आंबा आहे हे आम्हाला रंगवून सांगणे !...मग रस काढणे हे बाबांचे काम :)
दिवाळीत फटाके नवीन कपडे आणणे , आकाशदिवा आणणे ,आईने केलेले फराळाचे चवीने खाणे ...छोट्या छोट्या गोष्टी !!..आम्ही थोड्या मोठ्या झाल्यावर घरीच आकाशदिवा कसा तयार करायचे ते बाबांनीच शिकवले. त्यासाठी सगळे समान आणायला आम्हाला घेऊन जाणे.किती मजा यायची छोट्या छोट्या गोष्टींमध्ये!
परीक्षेच्या वेळी मनावर ताण आला की ..."राहू दे अभ्यास ...सिनेमा पहा मस्तं!!" म्हणायचे :) एखादी कॅडबरी आणून द्यायचे :)
तिघींना कुणाला कशाची आवड आहे हे पाहणे आईचे काम आणि त्या त्या स्पर्धांना घेऊन जाणे, बक्षीस मिळाले की / भेळ खाऊ घालणे , बागेत नेणे ...रॉयल ची पिस्ता कुल्फी , Kasata आईस्क्रींम , माळी वाड्यातला रगडा पाटीस, अप्पू हत्ती जवळचा कारंजा ...सगळं सगळं आमच्यासाठी :)
नवीन स्कूटर घेतली तेव्हा MIDC मधून ८० च्या वेगाने आम्हाला चक्कर मारून आणताना किती अभिमान वाटत होता बाबांना !!!
आम्ही कुणीही आजीकडे राहत असलो तर रोज एकदा ऑफिसमधून घरी जाताना भेटीला यायचा नियम त्यांनी कधी मोडला नाही.पोस्टाचे / बँकेचे व्यवहार आम्हला आलेच पाहिजेत असा आग्रह!...
मुली असलो तरी तिघींना engineering चे शिक्षण ,त्यासाठी पुण्यात admission घेऊन आम्हला लांब ठेवताना त्यांनी आमच्यावर जो विशास टाकला त्याचे मोल काय ? कुठल्याही प्रकारे मुली आहेत म्हणून घरात डांबून ठेवायचे नाही ."तुला जे आवडते ते कर" ...असा नेहेमी पाठींबा देत.
बाबांनी आमच्यावर कधीही स्वतःची मते लादली नाहीत. त्यांचा कधी मार खाल्ल्याचे मला तरी आठवत नाही. आम्ही थोड्या मोठ्या झाल्यावर त्यांना आमची एखादी गोष्ट पटली नाही तर तसे स्पष्ट सांगायचे आणि पुढे आम्ही काय करायचे ते आमच्यावर सोपवायचे. फार तर अबोला धरतील, पण त्याचीच आम्हाला जास्ती भीती वाटायची. बाबा आमच्याशी बोलले नाहीत तर काय उपयोग ? मग आमची गाडी स्वताहून रुळावर यायची :)पण यामुळेच त्यांच्या शब्दाला नेहेमी मान मिळत असे. शांत राहूनही आणि न मारतही मुलांना वळण लावता येते याचे उदाहरणच त्यांनी घालून दिले होते :)
माझ्या engineering admission च्या वेळी डायलिसीस करून माझ्याबरोबर रांगेत येऊन उभे राहिले होते.
१० वर्ष त्यांनी kidney failure ला तोंड दिले ...अनेक शस्त्रक्रिया, डायलिसीस सहन केल्या ...त्यांना किती त्रास होत आहे याची आम्हाला कधी जाणीव सुद्धा होऊ दिली नाही ..ते आजारी आहेत असे रडगाणे कधीच गायले नाही त्यांनी ..त्यांची सहनशक्ती आणि मनाचा निर्धार कमालीचा होता ..स्वतः आजारी असताना आमच्या तब्येतीची काळजी घ्या सांगायचे ...
बाबा गेल्यावर एक महिन्याने गौरीचे, माझ्या सगळ्यात लहान बहिणीचे लग्न होते. पण आईने जोपर्यंत समोर येऊन खंबीरपणे सांगितले नाही की मी तिचे लग्न छान करेन तोपर्यंत त्यांच्या पिंडाला कावळा शिवला नाही. हा चमत्कार होता का? माणूस गेल्यावर पण त्याचे मन आपल्यात इतके गुंतून राहते का?
आपल्या प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहावे, छान आयुष्य जगावे हीच त्यांची इच्छा होती. आज कधी नोकरी सोडून घरी बसावे असा विचार मनात आला तर बाबांची आमच्याकडून हि अपेक्षा नक्कीच नसेल . आमच्या शिक्षणा साठी त्यांनी कार घेतली नाही कधी अवाजवी खर्च केले नाहीत आणि ते सगळे वाया कसे घालवायचे? या विचाराने मन परत खंबीर होते.
"कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला!" या ओळीचा अर्थ बाबांच्या वागण्यातून कळला!
आताही बाबा भेटतात. आठवणींमध्ये, स्वप्नात आणि अजूनही खूप धीर देऊन जातात!!