Thursday, March 26, 2020

इंग्लिश विंग्लिश !!! भाग -१!




गेले २ आठवडे इंग्लिश विंग्लिश ची श्रीदेवी असल्यासारखा वाटतंय !!! बऱ्याच काळापासून मनात असलेला "योग शिक्षक " अभ्यासक्रम पूर्ण करायचा स्वप्न सत्यात उतरत होतं ! स्वतःलाच किती वेळा चिमटे काढायची इच्छा होत होती !! हे खरंच घडतंय याचा विश्वास बसत नव्हता !

 दोन वर्षांपूर्वी या अभ्यासक्रमाला रजिस्टर केले होते. पण जॉब  आणि बाकी कामांमुळे अभ्यास करायला मुहूर्त लागत नव्हता. प्रॅक्टिकल ला जाण्यापूर्वी अभ्यास पूर्ण करून  सगळ्या assignment पाठवायच्या होत्या आणि त्याची मुदत संपत आली होती. शेवटी मानाने  उचल खाल्ली आणि जॉब ला राम राम ठोकून बैठक मारून बसले. कारण त्याशिवाय वेळ मिळणं अवघड होतं. 'कुछ  पाने  के लिये , कुछ खोंना पडता है ' नियमानुसार मनाची समजूत घातली आणि तयारीला लागले. सकाळी लवकर उठून , मुलं शाळेत गेली की  , रात्री मुलं झोपली की  वेड्यासारखी वाचत होते. खूप वर्षांनी डोक्याला ताण मिळाल्याने सुरुवातीला अवघड वाटले . पण मग सवय झाली. अभ्यास केल्याचे एक वेगळेच समाधान मिळत गेले . ही  सगळी प्रक्रिया आवडायला लागली.

घरातही सगळे मला जमेल ती मदत करायला सरसावले. सकाळी बाबा (सासरे) लवकर उठले की मला रिंग देऊन उठवायचे. "अभ्यास करायचा आहे ना? "  मुलांना बजावायचे, " आई अभ्यास करते आहे, तिला त्रास देऊ नका !" आई (सासूबाई)  घरातली वरची काम माझ्यावर पडणार नाहीत याची खबरदारी घ्यायच्या. त्याही रोज सकाळी योगासने करत असल्यामुळे आमच्या चर्चा पण व्हायच्या काही नवीन वाचण्यात आले की .
मुलांसाठी तर आई अभ्यास करतेय हे एक नवलच  होतं. कारण ऐरवी अभ्यास त्यांनी करायचा असतो एवढंच
त्यांना माहिती होतं. आणि मग तेही शहाण्यासारखं मला वाचू देत ( आणि आपल्याला मिळणारे स्वातंत्र्य enjoy करत :) ) कधी कधी कंटाळून कधी संपणार तुझा अभ्यास असा तगादा पण लावत : ) कारण ऐरवी त्यांना मिळणारे संपूर्ण लक्ष कमी झाले होते. पण आजी आजोबा दुसरी बाजू उचलून धरत होते ! अमेरिकेतून अहो सुद्धा सतत देखरेख ठेवून प्रोत्साहन देण्याचे काम करत होतेच ! त्यामुळे अभ्यास पार पडला .  सगळ्या assignment पूर्ण करून पाठवून दिल्यावर हुश्शा केले !

आता वेळ आली प्रॅक्टिकल साठी रजिस्टर करायची. त्यासाठी लोणावळ्याला २ आठवडे राहायला जावे लागणार होते. मुलांना सोडून जायचे या कल्पनेने चलबिचल चालू होती. अशा वेळी एकदा कोपऱ्यावर मैत्रीण भेटली.
डोक्यात चालू असलेली द्विधा मनस्थिती तिला सांगितली. आणि तिने लग्गेच मला शांत केले !
"जा आणि कोर्स पूर्ण करून ये ! मुलांना बघायला आम्ही सगळे आहोत . काळजी करू नकोस !" किती बरं वाटलं एवढ्या एका वाक्याने ! बाकीच्याही मैत्रिणींनी सांगितले कि आम्ही अर्जुन ला खेळायला घेऊन जात जाऊ. काळजी करू नकोस. त्यामुळे परत उभारी धरून रजिस्टर केले .
उशिरा रजिस्टर केल्याने तिथे राहायची सोया होणार नव्हती. बाहेर हॉटेल मध्ये राहावे लागणार होते. पण एकटीने हॉटेल मध्ये राहायला  बरोबर वाटत नव्हते. आजकालच्या बातम्या वाचून मनात दडलेली भीती बाहेर येत होती . सगळ्यांनाच काळजी होती. मग आई बाबांनी जवळच्या नातेवाईकाकांना सांगून त्यांच्याकडे राहायची सोय केली ! एक काळजी मिटली ! ऑफिस मधली  एक मैत्रीण highway ला राहते. गरज पडली तर
माझ्या घरी  बिनधास्त ये राहायला असे मनमोकळे आमंत्रण दिले. तोही एक  option होता.

 आई बाबांबरोबर माझ्याही आईला बोलावलं रहायला.
आधी  आई बाबांची नर्मदा परिक्रमा त्याच वेळेस ठरलेली होती . तेव्हा (अगं ) आई ने दोन्ही मुलांना १५ दिवस सांभाळेन असं मला आश्वासन देऊन पाठिंबा दिला . या वयात तिने एकटीने दोघांना सांभाळणं तिच्यासाठी खूप challenging होतं तरीही !!! इकडे आई बाबांची पण ट्रिप कॅन्सल करायची  तयारी चालू होती . आणि  खरेच पुरेसे बुकिंग्स ना मिळाल्याने ट्रिप रद्द झाली !!! आणि आम्ही सगळेच हुश्श झालो . आता अहो आई बाबा  आणि अगं आई तिघंही मुलांबरोबर असणार होते त्यामुळे थोडे टेंशन कमी झाले . माझ्याहीपेक्षा या तिघांचा निर्धार ठाम होता मी कोर्से पूर्ण करावा म्हणून !!

आज्जी येणार म्हणून मुलं काय काय प्लॅन करण्यात मग्न होती. त्यामुळे  मी जरा निवांत झाले. 
सतत मुलांना बजावत होते , "मी नसताना असं  करा,  तसं करू नका " वगैरे . नक्की कळत  नव्हतं की ,  मी त्यांची तयारी करतेय की  स्वतःला समजावतेय !
निघायच्या दिवशी सगळी तयारी करून निघताना मुलं चिकटून बसली. शेवटी निघालेच. मोठ्यांचा आशीर्वाद घेतला . शेजारच्या काकूंनी पण तोंडभर आशीर्वाद दिला , 'यशस्वी होऊन ये '. शब्दात किती ताकद असते ते जाणवलं ! 

 आधी २ वेळा लोणावळ्याला  ड्राईव्ह करून गेले होते प्रॅक्टिस म्हणून. तेव्हा सगळे बरोबर होते. पण आता एकटीला जायचं होतं. सुरुवातीला उगीच दाटून आलेली भीती हळू हळू दूर झाली . highway वर गाडी मस्स्त पाळायला लागली.
एक वेगळीच जाणीव होत होती . आपण वेगळं काहीतरी करायला जातोय या निर्धाराने एक वेगळेच बळ आले.
कितीतरी वर्षांनी अशी एकटी बाहेर पडले होते. कैवल्यधाम ला पोहोचून सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या.
कोरोना च्या उद्रेका मुळे परदेशातून येणारे बरेच लोकं गळाले होते. त्यामुळे माझी कैवल्य धाम मधेच राहायची सोय झाली.  घरी सगळे  निर्धास्त  झाले !
त्या नंतर कैवल्यधाम मधले जे सुखद अनुभव आले त्यावर एक वेगळी पोस्ट लिहिणार आहेच.
रोजचे प्रॅक्टिकल्स , lecture, परीक्षा आणि प्रेसेंटेशन ची तयारी यात एक एक दिवस छान जात होता.
वेळ मिळाला  की घरी व्हिडिओ कॉल  करून आजी आजोबा आणि मुलांशी बोलत होते.  घरी दोन्ही आज्ज्या आणि आजोबा खिंड लढवत होते. मैत्रिणी पण अर्जुनला खेळायला नेत  होत्या .

एक आठवडा संपला आणि पुण्यात कोरोनामुळे लॉक डाउन जाहीर झाले.  तशी मला या सगळ्यांची काळजी वाटायला लागली. तेव्हा कोर्स पूर्ण करूनच ये असा ठामपणे सांगणाऱ्या आजी आजोबांचे मला खूप कौतुक वाटले . त्यामुळे मी शांतपणे लक्ष देऊ शकत होते. कोर्स मधल्या घडामोडी , गमती जमती सगळ्यांना रोज सांगत होते. अहो सुद्धा अमेरिकेतून रोज सकाळी मी उठले कि नाही याची खात्री करत होते. माझा good morning message किंवा कॉल आला नाही की लगेच कॉल यायचा. कारण रोज सकाळी ६.३० ला प्रॅक्टिकल असायचे . मध्ये मध्ये दोन्ही बहिणी, वन्स  बाई , मैत्रिणी  फोन करून माझी खबरबात घेत होत्या .
असे लाड करून घ्यायला खूप छान वाटत होते .

आज सगळ्या परीक्षा पूर्ण झाल्या. उद्या सकाळी समारोप समारंभ करून घरी परत जाणार !
एक स्वप्न पूर्ण केल्याचे वेगळेच समाधान वाटते आहे ! पण हे पूर्ण करताना घरच्यांनी घेतलेली काळजी , मैत्रिणींनी दिलेला आश्वासक आधार , मुलांनी दाखवलेला समजूतदारपणा, एवढं  बळ माझ्या पाठीशी होतं !
सगळा देश कोरोना मुळे बंद झाला तरी आमचा कोर्स चालू राहीला ! हे याच आशीर्वादांचं आणि शुभेच्छांचं फळ!!
एखादी गोष्ट मनापासून करायची इच्छा असेल तर मार्ग मिळत जातात याची प्रचिती आली !!

याहून वेगळं भाग्य ते काय असतं ??




भाग -२... लवकरच ....
(नक्की इंग्लिश विंग्लिश का वाटलं ... )