Wednesday, June 29, 2022

बाते छोटी छोटी - शब्दावाचून कळले सारे ....



काल मस्त drive करत होते .  Highway वरून exit lane मध्ये शिरायचे होते . तीच lane मागून दुसऱ्या रोड वरून highway ला merge होणारी पण होती. मागून एक कार येताना मला दिसली. अगदीच जवळ होती ती.  त्यामुळे मी आधी कि ती आधी हे कळणे गरजेचे होते. मी थोडा मागे पाहून right indicator दिले तसे त्या कार ने लेफ्ट indicator दिले. समजायचे ते समजून मी स्पीड वाढवला आणि exit lane मध्ये शिरले आणि माझ्या मागून ती कार highway ला merge झाली. 

किती सोपे ! एकही शब्द न वापरता शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले ! असे वाटून गेले क्षणभर ! नकळत मी त्या सुसाट जाणाऱ्या कार कडे बघून smile केले . 

हे नसते कळले किंवा हा कॉमन सेन्स traffic rule पाळला गेला नसता तर accident पण होऊ शकला असता. 

रोजच्या आयुष्यात पण असे होते ना नेहेमी ! आपल्या अवती भावतीच्या लोकांकडून आपण काही शब्दांच्या पलीकडले expect करत असतो. खास करून आपल्या जवळच्या व्यक्तींकडून . मग एखाद्या गोष्टीची त्यांना जाणीव होत नाही म्हणून आपले मन खट्टू होते. कधी कधी आपण सांगून सुद्धा कळत नाही तेव्हा तर विचारूच नका संवादाचे वादात रूपांतर होऊन आपला मुद्दा पटवून देण्याची जी काही शर्यत सुरु होते ! आपलाच मुद्दा कसा बरोबर हे पटवून देताना जरी जाणीव झाली कि समोरचा म्हणतो  तेही बरोबर आहे बरं का, तरीही आपलाही कसा बरोबर हे त्यालाही पटले पाहिजे ना !! मग होणार काय ? बरेच शाब्दिक accident होतात आणि बऱ्याच bhavana त्यात जीव गमावतात किंवा जखमी होतात. ज्यांचा कुठेही इलाज होणार नसतो किंवा इन्शुरन्स नसतो. 

अनोळखी लोकांबरोबर जर आपण हे कॉमन सेन्स rules पळू शकत असू तर मग जे आपल्या जवळचे आहेत त्यांच्या बरोबर सुद्धा ते लागू केले तर शब्दांच्या पलीकडले अजूनच दृढ होतील ना !! 


Thursday, June 10, 2021

बाते छोटी छोटी -२


खूप दिवसांपासून हा विषय मनात होता. पण आज लिहावेसे वाटले याला कारण मी पण तीच चूक केली !!


नाही नाही !! 😀!!खूप मोठी वाटेल अशी नाही पण मनाला न पटणारी एक गोष्ट केली !!😔😔

या वर्षी आम्ही घरात एक ठराव पास केला कि कुणीही घरी येणार असेल त्यांना आगाऊ (?)सूचना द्यायची कि मुलांसाठी चोकोलेट्स आणू नका . त्याला कारणही तसेच होते कि बऱ्याच वेळा लोक घाई घाई मध्ये येतात आणि आणायला सोपे , मुलांना आकर्षक असे मोठे मोठे चोकोलेट्स चे पॅकेट्स घरात येऊन पडतात. मग सारखे मुलांना कंट्रोल करावे लागते कि सारखे चोकोलेट्स खाऊ नका. 

ते पॅकेट्स  परत कुणाला भेट देणं  मनाला पटत नाही . त्यापेक्षा आणूच नका सांगितलं तर हळू हळू कळेल  लोकांना आणि समजून घेतील ते  नक्कीच !

खूप लोकांनी आमचा हा  'आगाऊ'  पणा  समजून घेतला आणि आमच्या विनंतीचा मान ठेवला. 

पण चकोलेट्स शिवाय अजूनही बऱ्याच गोष्टी आणणे आणि दुसऱ्यांच्या मुलांना देणे टाळले पाहिजे असे सतत मला वाटत राहिले. 

परवा  एक जण भेटायला आले . ते खूप जवळचे नव्हते त्यामुळे त्यांना आम्ही आगाऊ सांगू शकलो नाही  आणि त्यांनी पण अजाणतेपणी नेमकेबेकरी  स्वीट्स चे दोन मोठे पॅकेट्स आणले मुलांसाठी.  ते नाकारणे पण जमले नाही आम्हाला. एवढे मोठे पॅकेट्स आपण कसे संपवणार असा प्रश्न पडला !!

मग काय !!आम्हाला पण जायचेच होते २ ठिकाणी !

एक एक पॅकेट त्यांना देऊन टाकले !!! हुश्शा! घरातले पॅकेट्स तर गेले !

पण.... 

मनातले पॅकेट्स गेले नाहीत !!

जे मी माझ्या मुलांना खाऊ  घालणार नाही ते दुसऱ्यांच्या मुलांना देण्याची चूक मी केली जी माझ्याच तत्वाच्या विरुद्ध  होती ! म्हणून confession म्हणा किंवा माझ्या बरोबर इतरांनी पण हा विचार करावा यासाठी हा लेखन प्रपंच !

मी कितीही घाईत असले तरी दुसऱ्यांच्या मुलांना काही आणताना त्यांना ते उपयोगी पडेल का याचा कटाक्षाने विचार करते! आणि म्हणूनच माझेच मन मला खात राहिले. 

आजकाल प्रत्येक जण खाते पिते घर का असतो !! किंबहुना जास्तीच खात पीत असतो :)

त्यामुळे कुणाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये हे खरे असले तरी बळेच काही पण नेऊ नये हेही  महत्वाचे !

मध्ये माझ्या मुलाच्या वाढ दिवसाला अशाच एका साधन कुटुंबाने ओपन केलेले आणि नं  चालणारे खेळणे गिफ्ट दिले. तेव्हा वाईट वाटले कि नसतेच दिले तरी चालले असते ना?

खूप वेळा असे अनुभव येतात कि काही गोष्टी बळेच पास केलेल्या असतात . 

बाकी गोष्टींचे जाऊ देत... पण जेव्हा गोष्ट मुलांच्या आरोग्याची असते तेव्हा हा विचार व्हायलाच हवा !

काय देऊ शकतो आपण ?

- मुलांना घरी बनवलेला एखादा पौष्टिक खाऊ, ड्राय फ्रुटस, फ्रेश फ्रुटस, healthy snacks

- त्यांच्या वयाला साजेसे छोटेसे खेळणे, एखादा डोक्याला खाऊ असलेला game ?

- सहज जमेल अशी activity 

- वयाला  साजेसे छोटेसे पुस्तक?

- खेळताना वापरता येईल अशी एखादी वस्तू?


पर्याय खूप आहेत ! थोडासा विचार हवा !

काहीच नाही जमले तर आपला थोडासा वेळ !!

वेळे वरून आठवलं !

मागे आमचे खूप जवळचे मित्र कुटुंब भेटायला आले होते.

त्यांनी आल्या आल्या आधी मुलांशी संवाद साधला . मुलांना पत्ते  खेळायला दोन नवीनडाव  शिकवले. 

छोट्या मुलाशी त्याच्या सारखाच छोटा होऊन मस्ती केली ! त्याचे कौतुक केले !

मुलं खुश! आमच्याशी पण गप्पा टप्पा झाल्याच ! पण ते गेल्या नंतर पण आम्ही रोज ते game खेळताना त्यांची आठवण काढत होतो !

आपण पण असे करू शकतो अशी नकळत शिकावण आम्हाला पण मिळाली :)


कुठे तरी हे छोटे बदल घडायला हवेत ! आपली मुलं काय किंवा दुसऱ्याची काय ! काळजी सगळ्यांचीच घ्यायला हवी :)


आहे कि नाही ?बात छोटीसी मगर सोच नयी ?

ता. क . - वरील पर्यायांमध्ये अजून काही नक्कीच सुचवू शकता !







Thursday, March 26, 2020

इंग्लिश विंग्लिश !!! भाग -१!




गेले २ आठवडे इंग्लिश विंग्लिश ची श्रीदेवी असल्यासारखा वाटतंय !!! बऱ्याच काळापासून मनात असलेला "योग शिक्षक " अभ्यासक्रम पूर्ण करायचा स्वप्न सत्यात उतरत होतं ! स्वतःलाच किती वेळा चिमटे काढायची इच्छा होत होती !! हे खरंच घडतंय याचा विश्वास बसत नव्हता !

 दोन वर्षांपूर्वी या अभ्यासक्रमाला रजिस्टर केले होते. पण जॉब  आणि बाकी कामांमुळे अभ्यास करायला मुहूर्त लागत नव्हता. प्रॅक्टिकल ला जाण्यापूर्वी अभ्यास पूर्ण करून  सगळ्या assignment पाठवायच्या होत्या आणि त्याची मुदत संपत आली होती. शेवटी मानाने  उचल खाल्ली आणि जॉब ला राम राम ठोकून बैठक मारून बसले. कारण त्याशिवाय वेळ मिळणं अवघड होतं. 'कुछ  पाने  के लिये , कुछ खोंना पडता है ' नियमानुसार मनाची समजूत घातली आणि तयारीला लागले. सकाळी लवकर उठून , मुलं शाळेत गेली की  , रात्री मुलं झोपली की  वेड्यासारखी वाचत होते. खूप वर्षांनी डोक्याला ताण मिळाल्याने सुरुवातीला अवघड वाटले . पण मग सवय झाली. अभ्यास केल्याचे एक वेगळेच समाधान मिळत गेले . ही  सगळी प्रक्रिया आवडायला लागली.

घरातही सगळे मला जमेल ती मदत करायला सरसावले. सकाळी बाबा (सासरे) लवकर उठले की मला रिंग देऊन उठवायचे. "अभ्यास करायचा आहे ना? "  मुलांना बजावायचे, " आई अभ्यास करते आहे, तिला त्रास देऊ नका !" आई (सासूबाई)  घरातली वरची काम माझ्यावर पडणार नाहीत याची खबरदारी घ्यायच्या. त्याही रोज सकाळी योगासने करत असल्यामुळे आमच्या चर्चा पण व्हायच्या काही नवीन वाचण्यात आले की .
मुलांसाठी तर आई अभ्यास करतेय हे एक नवलच  होतं. कारण ऐरवी अभ्यास त्यांनी करायचा असतो एवढंच
त्यांना माहिती होतं. आणि मग तेही शहाण्यासारखं मला वाचू देत ( आणि आपल्याला मिळणारे स्वातंत्र्य enjoy करत :) ) कधी कधी कंटाळून कधी संपणार तुझा अभ्यास असा तगादा पण लावत : ) कारण ऐरवी त्यांना मिळणारे संपूर्ण लक्ष कमी झाले होते. पण आजी आजोबा दुसरी बाजू उचलून धरत होते ! अमेरिकेतून अहो सुद्धा सतत देखरेख ठेवून प्रोत्साहन देण्याचे काम करत होतेच ! त्यामुळे अभ्यास पार पडला .  सगळ्या assignment पूर्ण करून पाठवून दिल्यावर हुश्शा केले !

आता वेळ आली प्रॅक्टिकल साठी रजिस्टर करायची. त्यासाठी लोणावळ्याला २ आठवडे राहायला जावे लागणार होते. मुलांना सोडून जायचे या कल्पनेने चलबिचल चालू होती. अशा वेळी एकदा कोपऱ्यावर मैत्रीण भेटली.
डोक्यात चालू असलेली द्विधा मनस्थिती तिला सांगितली. आणि तिने लग्गेच मला शांत केले !
"जा आणि कोर्स पूर्ण करून ये ! मुलांना बघायला आम्ही सगळे आहोत . काळजी करू नकोस !" किती बरं वाटलं एवढ्या एका वाक्याने ! बाकीच्याही मैत्रिणींनी सांगितले कि आम्ही अर्जुन ला खेळायला घेऊन जात जाऊ. काळजी करू नकोस. त्यामुळे परत उभारी धरून रजिस्टर केले .
उशिरा रजिस्टर केल्याने तिथे राहायची सोया होणार नव्हती. बाहेर हॉटेल मध्ये राहावे लागणार होते. पण एकटीने हॉटेल मध्ये राहायला  बरोबर वाटत नव्हते. आजकालच्या बातम्या वाचून मनात दडलेली भीती बाहेर येत होती . सगळ्यांनाच काळजी होती. मग आई बाबांनी जवळच्या नातेवाईकाकांना सांगून त्यांच्याकडे राहायची सोय केली ! एक काळजी मिटली ! ऑफिस मधली  एक मैत्रीण highway ला राहते. गरज पडली तर
माझ्या घरी  बिनधास्त ये राहायला असे मनमोकळे आमंत्रण दिले. तोही एक  option होता.

 आई बाबांबरोबर माझ्याही आईला बोलावलं रहायला.
आधी  आई बाबांची नर्मदा परिक्रमा त्याच वेळेस ठरलेली होती . तेव्हा (अगं ) आई ने दोन्ही मुलांना १५ दिवस सांभाळेन असं मला आश्वासन देऊन पाठिंबा दिला . या वयात तिने एकटीने दोघांना सांभाळणं तिच्यासाठी खूप challenging होतं तरीही !!! इकडे आई बाबांची पण ट्रिप कॅन्सल करायची  तयारी चालू होती . आणि  खरेच पुरेसे बुकिंग्स ना मिळाल्याने ट्रिप रद्द झाली !!! आणि आम्ही सगळेच हुश्श झालो . आता अहो आई बाबा  आणि अगं आई तिघंही मुलांबरोबर असणार होते त्यामुळे थोडे टेंशन कमी झाले . माझ्याहीपेक्षा या तिघांचा निर्धार ठाम होता मी कोर्से पूर्ण करावा म्हणून !!

आज्जी येणार म्हणून मुलं काय काय प्लॅन करण्यात मग्न होती. त्यामुळे  मी जरा निवांत झाले. 
सतत मुलांना बजावत होते , "मी नसताना असं  करा,  तसं करू नका " वगैरे . नक्की कळत  नव्हतं की ,  मी त्यांची तयारी करतेय की  स्वतःला समजावतेय !
निघायच्या दिवशी सगळी तयारी करून निघताना मुलं चिकटून बसली. शेवटी निघालेच. मोठ्यांचा आशीर्वाद घेतला . शेजारच्या काकूंनी पण तोंडभर आशीर्वाद दिला , 'यशस्वी होऊन ये '. शब्दात किती ताकद असते ते जाणवलं ! 

 आधी २ वेळा लोणावळ्याला  ड्राईव्ह करून गेले होते प्रॅक्टिस म्हणून. तेव्हा सगळे बरोबर होते. पण आता एकटीला जायचं होतं. सुरुवातीला उगीच दाटून आलेली भीती हळू हळू दूर झाली . highway वर गाडी मस्स्त पाळायला लागली.
एक वेगळीच जाणीव होत होती . आपण वेगळं काहीतरी करायला जातोय या निर्धाराने एक वेगळेच बळ आले.
कितीतरी वर्षांनी अशी एकटी बाहेर पडले होते. कैवल्यधाम ला पोहोचून सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या.
कोरोना च्या उद्रेका मुळे परदेशातून येणारे बरेच लोकं गळाले होते. त्यामुळे माझी कैवल्य धाम मधेच राहायची सोय झाली.  घरी सगळे  निर्धास्त  झाले !
त्या नंतर कैवल्यधाम मधले जे सुखद अनुभव आले त्यावर एक वेगळी पोस्ट लिहिणार आहेच.
रोजचे प्रॅक्टिकल्स , lecture, परीक्षा आणि प्रेसेंटेशन ची तयारी यात एक एक दिवस छान जात होता.
वेळ मिळाला  की घरी व्हिडिओ कॉल  करून आजी आजोबा आणि मुलांशी बोलत होते.  घरी दोन्ही आज्ज्या आणि आजोबा खिंड लढवत होते. मैत्रिणी पण अर्जुनला खेळायला नेत  होत्या .

एक आठवडा संपला आणि पुण्यात कोरोनामुळे लॉक डाउन जाहीर झाले.  तशी मला या सगळ्यांची काळजी वाटायला लागली. तेव्हा कोर्स पूर्ण करूनच ये असा ठामपणे सांगणाऱ्या आजी आजोबांचे मला खूप कौतुक वाटले . त्यामुळे मी शांतपणे लक्ष देऊ शकत होते. कोर्स मधल्या घडामोडी , गमती जमती सगळ्यांना रोज सांगत होते. अहो सुद्धा अमेरिकेतून रोज सकाळी मी उठले कि नाही याची खात्री करत होते. माझा good morning message किंवा कॉल आला नाही की लगेच कॉल यायचा. कारण रोज सकाळी ६.३० ला प्रॅक्टिकल असायचे . मध्ये मध्ये दोन्ही बहिणी, वन्स  बाई , मैत्रिणी  फोन करून माझी खबरबात घेत होत्या .
असे लाड करून घ्यायला खूप छान वाटत होते .

आज सगळ्या परीक्षा पूर्ण झाल्या. उद्या सकाळी समारोप समारंभ करून घरी परत जाणार !
एक स्वप्न पूर्ण केल्याचे वेगळेच समाधान वाटते आहे ! पण हे पूर्ण करताना घरच्यांनी घेतलेली काळजी , मैत्रिणींनी दिलेला आश्वासक आधार , मुलांनी दाखवलेला समजूतदारपणा, एवढं  बळ माझ्या पाठीशी होतं !
सगळा देश कोरोना मुळे बंद झाला तरी आमचा कोर्स चालू राहीला ! हे याच आशीर्वादांचं आणि शुभेच्छांचं फळ!!
एखादी गोष्ट मनापासून करायची इच्छा असेल तर मार्ग मिळत जातात याची प्रचिती आली !!

याहून वेगळं भाग्य ते काय असतं ??




भाग -२... लवकरच ....
(नक्की इंग्लिश विंग्लिश का वाटलं ... )




 

Wednesday, May 19, 2010

I Love my cycle :)

लहानपणी आकर्षण वाटणारी सायकल! थोडे मोठे झाल्यावर शाळेत जायला हातात मिळाली :) मोठ्या बहिणीची ATLAS सायकल!आजीच्या वाड्यातल्या मैत्रिणीने, दीप्तीने सायकल चालवायला शिकवली :) शिकताना आधी नुसताच एक पाय paddle वर आणि दुसरा पाय जमिनीवर, मग हळूच दुसराही पाय paddle वर टाकून अर्धे paddle मारत तोल सांभाळणे, कधीतरी पहिल्यांदा धाडस करून मारलेला पहिला पूर्ण paddle , मग धिटाई वाढून आधी अंगणात आणि मग रस्त्याच्या कडेने मारलेल्या चकरा!! कधी धड्पले तरी उठून परत सायकल शिकायची उर्मी, मग लहान बहिणीला मागे बसवून " double seat " , शाळेत जाताना मैत्रिणींबरोबर लावलेली सायकल शर्यत !!...कित्ती आठवणी सायकलच्या :)

कॉलेजला गेल्यापासून scooty ,activa भुरळ घालायला लागल्या, मोठ्या शहरात घर आणि college अंतर मोठे, मग सायकल मागेच पडली. कधी आठवण पण नाही आली तिची :(

लग्नानंतर अहोंच्या वाढदिवसाला surprise गिफ्ट म्हणून ६ गेअर्स ची सायकल दिली :)घरात सायकल नव्हती. मग शेंडेफळ असल्यासारखा तिचा कौतुक वाटत राहिलं :) पण ते तेवढ्यापुरताच :( रोजच्या धावपळीत नंतर ती धूळ खात पडली:(
जवळ जवळ ३-४ वर्षांनी थोडा व्यायाम तरी होईल म्हणून तिला दुकानात नेऊन ठीक ठाक करून आणलं.आणि एका सकाळी मस्तं सायकल वर स्वार होऊन फिरायला गेले!! चढावरून जाताना दमछाक झाली पण तो आनंद वेगळाच होता :) जाताना दमछाक होणे, येताना उतारावरून paddle नं मारता सुर्र्रर्रर्र्र्र करत येणे, गार गार वारा, तोही कुठलेही प्रदूषण नं करता, पेट्रोल नं जाळता आणि CALARIES जाळता जाळता :)

परवा एक छान गोष्टं दिसली. आई बाबा २ सायकल वर २ बाजूंनी आणि त्यांची छोटीशी मुलगी छोट्याश्या सायकल वर त्यांच्या मधून मजेत फिरायला चालले होते :)

आता मी आठवड्यातून २-३ वेळा तरी सायकल वर फिरायला जाते सकाळी :) माझा हा उत्साह असाच टिकेल असा आता मलाच विश्वास वाटतोय. म्हणून लिहायचा धाडस केलं :)माझ्यासारखी थोड्या फार फरकाने प्रत्येकाचीच सायकल गोष्टं असणार. पण हे वाचून कुणाला सायकल चालवायची इच्छा झाली तर JOIN ME :)

फिरायला जाण्याव्यतिरिक्त जवळची कामं करायला सायकल वापरली तर प्रदूषणात आणि तब्येतीत किती फरक पडेल ;-? मी हे अजून सुरु केले नाहीये. केल्यावर कळवेनच :)
तूर्तास "चला सायकलस्वार व्हा :)"

Thursday, May 6, 2010

मंतरलेल्या गोष्टी! -"नटरंग"



तसे "नटरंग" प्रदर्शित होऊन बरेच दिवस झालेत. त्याचे समीक्षण वगैरे इथे लिह्याचा मानस नाहीये. मी आणि "अहों"नी खास "प्रभात" ला जाऊन पहिला होता हा सिनेमा :)कारण मराठी म्हणजे "प्रभात" हे समीकरण आजचे multiplex अजूनही मोडू शकले नाहीयेत :) सिनेमा पाहिल्यावर आम्ही दोघेही सारखेच वेडे झालो होतो!! त्यातली कथा, जरा हटके "नच्याचे" काम करणारा गुणा, सगळेच कलाकार आणि अप्रतिम संगीत!!! नंतर आम्ही परत आपापल्या कामात गुंतून गेलो. परवा ऑफिसमध्ये सहज एकाकडून mobile वर ऐकायला "नटरंग" ची गाणी मिळाली :) मी जाम खुश झाले !!! मग काय बस मधून जाता येता माझी पारायणं सुरु झाली :) प्रत्येक गाणं किती वेळा ऐकू असं प्रत्येक वेळी होतंय :) मंतरलेलं मंतरलेलं म्हणतात ते हेच असता का ? लगेच इंटरनेट वर "मेकिंग ऑफ नटरंग" शोधून काढलं. त्या कलावंतांचे अगदी स्पॉट बॉय पासून सगळ्यांचे अनेक क्षण टिपलेले फोटो पाहायला मिळाले :)
हा चित्रपट करायचा हे कुणी ठरवलं असेल तो क्षण आणि रसिकांनी त्याला HOUSE FULL करून टाकण्याचे यश...यामध्ये किती कष्ट घेतले असतील आख्ख्या टीम ने !!कसली धुंदी असेल प्रत्येकावर यात काम करताना? प्रत्येकाच्या कामाचा भाग जोडून एक सुंदर collage कसा तयार झाला असेल? आम्ही college मध्ये छोटी छोटी नाटकं, dances बसवायचो तेव्हा सगळेजण एका भारावलेल्या स्थितीत असायचे. तसंच यांचाही झाल असेल का?

अजय अतुल जोडीने अतुलनीय दिलेलं संगीत एखाद्यावर इतकी जादू करू शकतं?? त्यातला प्रत्येक शब्द, music piece , गाण्याच्या चाली, खूप मेहनत घेऊन विशिष्ट ग्रामीण पद्धतीने गायलेला प्रत्येक शब्द मंत्रमुग्ध करून टाकतात!!
"नटरंग उभा " मध्ये chorus चे किती कौतुक करावे तेवढे कमीच. कलावंताबद्दल किती आदर वाटतो हे गाणं ऐकताना!! देवाला आणि रसिकांना त्यांची "किरपा" मिळवण्यासाठी केलेली आर्जव मनाला भिडते !

"खेळ मांडला" मधली आर्तता अवर्णनीय आहे!!

"अप्सरा आली " मधला शृंगार बेधुंद करणारा आहे!! हे गाणं ऐकताना आपलंच मन घुंगरू बांधून नाचायला लागते :)

" आता वाजले की बारा" - उडत्या चालीने सगळ्यांना वेड लावून जातं :)

एक अप्रतिम कलाकृती !!! एक मंतरलेली गोष्टं!!! आणि काय लिहू?

PLease visit the link:
http://en.wikipedia.org/wiki/Natarang

Thursday, April 29, 2010

पहिला पाउस !!!



रोज सकाळी झोपेत ६.३० चा गजर बंद करणारी मी आज कुठल्याश्या मंद मंद सुवासाने क्षणात जागी झाले :)खिडकीतून गार गार हवेबरोबर मातीचा गंध हलकेच आत शिरला होता :) पहाटेच हलकासा पाऊस अंगणात सडा घालून गेला होता !! मन थोडा खट्टू झाला की आज पण मी त्याला miss केलं :( एवढ्यात तो मी office मध्ये असले की घरी बरसून जात होता किंवा गावाच्या दुसऱ्या भागात बरसून गेल्याच्या वार्ता येत होत्या.पण बाहेरचे थंड वातावरण, अजूनही मागे रेंगाळलेले ढग, आणि त्यामागे दडून बसलेला सूर्य, मातीचा वास मला परत झोपू देईनात ;) चक्कं उठले आणि एक फेरफटका मारून आले :) बाहेरचे रस्ते, झाडं आज अभ्यंगस्नान करून प्रसन्न पणे वारयावर झुलत होती. सगळं काही ताजं तवानं वाटत होतं. आज शुक्रवार त्यातून माझे आवडते वातावरण!! पटकन तयार होत होते आणि बाहेर "टप टप टप टप" आवाज करत पाऊस मला भेटायला आला :)
खिडकीपाशी पळत जाऊन त्याला Hi ! केले :) आईंनी आणलेली सोनचाफ्याची फुले खिडकी ठेवून दिली. मग काय, मातीच्या सुवासात सोनचाफ्याचा मंद मंद सुवास सामील झाला :)
मस्तं मूड मध्ये ऑफिसला जायला निघाले. आणि आज चक्कं radio mirchi ने पण "३ गाने back to back" माझ्या आवडीची लावली :) हिंजवडी मधली बोगनवेल आज जास्तीच खुदू खुदू हसत होती :)

तर असा हा माझ्यासाठीचा पहिला पाउस माझा Friday "Special " करून गेलाय :)
आता नुकतीच सूर्याची किरणं ढगांची गर्दी बाजूला सारत आमच्यापर्यंत पोहोचली आहेत आणि मला "काम कर" असे सांगत आहेत :)

Wednesday, March 31, 2010

"एक तरी झाड असे लावावे शहाणे!"

लहानपणी मला पुण्याबद्दल नेहेमीच आकर्षण वाटायचे.शिवाय इतिहासाच्या पुस्तकात बाल शिवाजी आणि जिजाबाई यांनी पुण्यात स्वराज्याचा पाया कसा घातला, पुण्याच्या आसपासचे गड कसे जिंकले, नवीन कसे बांधले, सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळत गनिमी कावे कसे शिकले, एवढा मोठा शत्रू, मुघल, त्यांना कसे नमवले अश्या अनेक गोष्टीनी पुण्याबाद्दल्ची उत्सुकता वाढली होती. पाचवी मध्ये असताना पुण्यात सहलीला यायचा योग आला. तेव्हा लाल महाल, शनिवार वाडा, सारस बाग, केळकर संग्रहालय, अप्पू घर सगळं पाहून खूप मजा आली होती.
मावशी पुण्यात राहायला होती. सुट्टीत एखादी चक्कर तिच्या घरी व्हायची. मग पुण्यात एवढ्या पेठ कशा काय तयार केल्या असतील असे कुतूहल वाटत राहायचे. इथल्या लोकांची बोलायची ढब पण थोडी वेगळीच :)
मग १२ वी नंतर engineering college मध्ये admission घेऊन एकदाची मी पुण्यात आले :) तेव्हा पुणं एवढा गजबजलेला नव्हतं. रस्त्यांवर ओथंबून वाहणारी गर्दी नव्हती. रिटायर लोकांचे विश्राम स्थान, विद्येचे माहेर घर आणि थंड हवेच गाव म्हणून अजूनही पुण्याची ख्याती होती. हळू हळू आमच्या सारखी लोकं शिक्षण/नोकरीच्या निमित्तानं पुण्यात आले आणि इथेच स्थायिक झाले.बरयाच आय. टी. कंपन्यांनी आपापली पाळे मुळे रुजवली. लोकांना अजून नोकर्या मिळू लागल्या. मग हळू हळू इतर उद्योग धंदे पण जोर धरू लागले आणि पुणे हे औद्योगिक नागरी बनायला लागली. पुण्यात वेगवेगळ्या कारणांसाठी लोकं घरे बंधू लागली. कुणाची नोकरी इथेच म्हणून. कुणी वीकेंड होम म्हणून.कुणी INVESTMENT म्हणून.पुण्याचा विस्तार वाढायला लागला. रस्त्यांवरची गर्दी वाढली. मग मोठे रस्ते पाहिजेत, राहायला जागा पाहिजे म्हणून हळू हळू झाडे जमीनदोस्त होऊ लागली. वाहनांची वाढती संख्या प्रदूषणात भर पडू लागली. बांधकाम व्यावसायिकांचे तर चांगलेच फावले. जागा मिळेल तिथे इमारती उभ्या व्हायला लागल्या. अर्थातच तिथलीही झाडं कापून त्या जागा NA केल्या असणारच.आता गावातली जागा कमी पडते म्हणून गावाभोवतली असणाऱ्या सुंदर टेकड्या पोखरल्या जात आहेत. मुंबई -बंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नजर टाकली तर याची पावती मिळेल. बघावे तिकडे इमारतीच इमारती. गाड्याच गाड्या, माणसेच माणसे !!एवढी झाडं तोडून, प्रदूषण करून तापमान वाढेल नाही तर काय? थंड थंड म्हणता म्हणता पुण्याचा पारा उन्हाळ्यात ४०- ४२ वर कसा जातो हे AC मध्ये बसून कसे कळणार?

अशी अवस्था होणारे हे पहिलेच शहर नाही. ज्या ज्या गावाचे शहरीकरण/औद्योगिकीकरण होते ते याच अवस्थांमधून जात असणार.

निवांत जगणारं पुणं घड्याळाच्या काट्यांवर केव्हा पाळायला लागलं हे त्यालाही कळलं नसेल. पोटाची खळगी भरणारी माणसं जेव्हा खिसे आणि तिजोर्या भरायला लागतात तेव्हा स्वार्थी होतात. आणि हाच स्वार्थ विनाश ओढवून घेणारा असतो. हे सगळं कुठे थांबणार याची कुणालाच काळजी नाही. आला दिवस गेला असे आपण जगत असतो. मी सुदधा याच प्रक्रियेचा घटक आहे. आपण सर्वच आहोत. मग आपणच हे सर्व सुधारायला नको का?

"झाड़े लावल तर वाचाल!" हि आजची गरज झाली आहे. झाडांचे महत्व मी वेगळे संगायला नको.
प्रत्येकाने जाणीव पुर्वक एक तरी मोठे झाड आणि शक्य तितकी रोपे लावली तर आपले शहर सुन्दर तर होइलच पण पर्यावरणाची झीज काही अंशी तरी भरून निघेल.झाडे लावणे हा रिकामटेकडा उद्योग आहे असे मानून डोळे झाकून दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळात वेळ काढून एखादे रोप फुलवून तर पाहू!!

मी कुठेतरी वाचले होते:
"We have not INHERITED this Earth, We have BORROWED it from our future generations!!"
किती खरं आहे ! जे चांगलं आयुष्य/ पर्यावरण आपल्याला मिळालं आहे त्यापेक्षा भर भरून आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळाले पाहिजे!.

पुण्याच्या घरा घरा भोवती, रस्त्यांच्या कडेला, नद्याच्या काठी, टेकड्या वर् ,सुन्दर झाडी, फुल झाडी असलेला चित्र प्रत्येकाच्या मनात असेल तर का नाही हे शक्य होणार? निसर्गाकडून भरभरून घेताना त्याला थोडंसं परत दिल्याचा समाधान तरी मिळेल. पुण्याबद्दल लिहिते आहे कारण सध्या मी इथे राहते, जगते . हि जाणीव मला इथेच झाली. प्रत्यक्षात आपण असू तिथे आपण हे निसर्गाचे देणे फेडले पाहिजे.खुप गोष्टि करता येतिल. एका झाड़ाने सुरु करु या?

"फिटावे हे जरा तरी जगण्याचे देणे,
एक तरी झाड असे लावावे शहाणे! "


निसर्ग प्रेमींसाठी छोटीशी भेट :
१) In India, One Man Creates a Forest
http://forests.org/archive/asia/indfor.htm
२) The man who planted trees!!!
http://home.infomaniak.ch/arboretum/Man_Tree.htm
३) Green Hills Group!!
http://www.greenhillsgroup.org/index.html