Wednesday, March 31, 2010

"एक तरी झाड असे लावावे शहाणे!"

लहानपणी मला पुण्याबद्दल नेहेमीच आकर्षण वाटायचे.शिवाय इतिहासाच्या पुस्तकात बाल शिवाजी आणि जिजाबाई यांनी पुण्यात स्वराज्याचा पाया कसा घातला, पुण्याच्या आसपासचे गड कसे जिंकले, नवीन कसे बांधले, सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळत गनिमी कावे कसे शिकले, एवढा मोठा शत्रू, मुघल, त्यांना कसे नमवले अश्या अनेक गोष्टीनी पुण्याबाद्दल्ची उत्सुकता वाढली होती. पाचवी मध्ये असताना पुण्यात सहलीला यायचा योग आला. तेव्हा लाल महाल, शनिवार वाडा, सारस बाग, केळकर संग्रहालय, अप्पू घर सगळं पाहून खूप मजा आली होती.
मावशी पुण्यात राहायला होती. सुट्टीत एखादी चक्कर तिच्या घरी व्हायची. मग पुण्यात एवढ्या पेठ कशा काय तयार केल्या असतील असे कुतूहल वाटत राहायचे. इथल्या लोकांची बोलायची ढब पण थोडी वेगळीच :)
मग १२ वी नंतर engineering college मध्ये admission घेऊन एकदाची मी पुण्यात आले :) तेव्हा पुणं एवढा गजबजलेला नव्हतं. रस्त्यांवर ओथंबून वाहणारी गर्दी नव्हती. रिटायर लोकांचे विश्राम स्थान, विद्येचे माहेर घर आणि थंड हवेच गाव म्हणून अजूनही पुण्याची ख्याती होती. हळू हळू आमच्या सारखी लोकं शिक्षण/नोकरीच्या निमित्तानं पुण्यात आले आणि इथेच स्थायिक झाले.बरयाच आय. टी. कंपन्यांनी आपापली पाळे मुळे रुजवली. लोकांना अजून नोकर्या मिळू लागल्या. मग हळू हळू इतर उद्योग धंदे पण जोर धरू लागले आणि पुणे हे औद्योगिक नागरी बनायला लागली. पुण्यात वेगवेगळ्या कारणांसाठी लोकं घरे बंधू लागली. कुणाची नोकरी इथेच म्हणून. कुणी वीकेंड होम म्हणून.कुणी INVESTMENT म्हणून.पुण्याचा विस्तार वाढायला लागला. रस्त्यांवरची गर्दी वाढली. मग मोठे रस्ते पाहिजेत, राहायला जागा पाहिजे म्हणून हळू हळू झाडे जमीनदोस्त होऊ लागली. वाहनांची वाढती संख्या प्रदूषणात भर पडू लागली. बांधकाम व्यावसायिकांचे तर चांगलेच फावले. जागा मिळेल तिथे इमारती उभ्या व्हायला लागल्या. अर्थातच तिथलीही झाडं कापून त्या जागा NA केल्या असणारच.आता गावातली जागा कमी पडते म्हणून गावाभोवतली असणाऱ्या सुंदर टेकड्या पोखरल्या जात आहेत. मुंबई -बंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नजर टाकली तर याची पावती मिळेल. बघावे तिकडे इमारतीच इमारती. गाड्याच गाड्या, माणसेच माणसे !!एवढी झाडं तोडून, प्रदूषण करून तापमान वाढेल नाही तर काय? थंड थंड म्हणता म्हणता पुण्याचा पारा उन्हाळ्यात ४०- ४२ वर कसा जातो हे AC मध्ये बसून कसे कळणार?

अशी अवस्था होणारे हे पहिलेच शहर नाही. ज्या ज्या गावाचे शहरीकरण/औद्योगिकीकरण होते ते याच अवस्थांमधून जात असणार.

निवांत जगणारं पुणं घड्याळाच्या काट्यांवर केव्हा पाळायला लागलं हे त्यालाही कळलं नसेल. पोटाची खळगी भरणारी माणसं जेव्हा खिसे आणि तिजोर्या भरायला लागतात तेव्हा स्वार्थी होतात. आणि हाच स्वार्थ विनाश ओढवून घेणारा असतो. हे सगळं कुठे थांबणार याची कुणालाच काळजी नाही. आला दिवस गेला असे आपण जगत असतो. मी सुदधा याच प्रक्रियेचा घटक आहे. आपण सर्वच आहोत. मग आपणच हे सर्व सुधारायला नको का?

"झाड़े लावल तर वाचाल!" हि आजची गरज झाली आहे. झाडांचे महत्व मी वेगळे संगायला नको.
प्रत्येकाने जाणीव पुर्वक एक तरी मोठे झाड आणि शक्य तितकी रोपे लावली तर आपले शहर सुन्दर तर होइलच पण पर्यावरणाची झीज काही अंशी तरी भरून निघेल.झाडे लावणे हा रिकामटेकडा उद्योग आहे असे मानून डोळे झाकून दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळात वेळ काढून एखादे रोप फुलवून तर पाहू!!

मी कुठेतरी वाचले होते:
"We have not INHERITED this Earth, We have BORROWED it from our future generations!!"
किती खरं आहे ! जे चांगलं आयुष्य/ पर्यावरण आपल्याला मिळालं आहे त्यापेक्षा भर भरून आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळाले पाहिजे!.

पुण्याच्या घरा घरा भोवती, रस्त्यांच्या कडेला, नद्याच्या काठी, टेकड्या वर् ,सुन्दर झाडी, फुल झाडी असलेला चित्र प्रत्येकाच्या मनात असेल तर का नाही हे शक्य होणार? निसर्गाकडून भरभरून घेताना त्याला थोडंसं परत दिल्याचा समाधान तरी मिळेल. पुण्याबद्दल लिहिते आहे कारण सध्या मी इथे राहते, जगते . हि जाणीव मला इथेच झाली. प्रत्यक्षात आपण असू तिथे आपण हे निसर्गाचे देणे फेडले पाहिजे.खुप गोष्टि करता येतिल. एका झाड़ाने सुरु करु या?

"फिटावे हे जरा तरी जगण्याचे देणे,
एक तरी झाड असे लावावे शहाणे! "


निसर्ग प्रेमींसाठी छोटीशी भेट :
१) In India, One Man Creates a Forest
http://forests.org/archive/asia/indfor.htm
२) The man who planted trees!!!
http://home.infomaniak.ch/arboretum/Man_Tree.htm
३) Green Hills Group!!
http://www.greenhillsgroup.org/index.html

Friday, March 26, 2010

रंग वसंताचे!

तसे मला प्रत्येक ऋतू मध्ये काही ना काही आवडते :) गुलाबी थंडी मधली रजई गुरफटलेली रात्र आणि सकाळ , हवीहवीशी वाटणारी उबदार दुपार! -

पावसाळ्यातले धुंद कुंद वातावरण :) सर सर सरी, ढगांचा आवाज, कडकडणारी वीज, हिरवी हिरवी झाडं, डोंगरांवरून कोसळणारे झरे (पावसाळा माझा सर्वात लाडका ऋतू :)...त्याबद्दल लिहीन तेवढं कमीच !) ...आणि आत्ता चालू असणारा उन्हाळा - वसंत ऋतू!!



हल्ली रोज साधारण सकाळी ६ च्या सुमारास सूर्य नारायणाचे आगमन होते :) हलकासा उजेड निव्वळ १५ - २० मिनिटांमध्ये सगळं आकाश उजळवून टाकतो!! एक अनोखं चैतन्य चराचरामध्ये भरून जातं !! एवढ्याश्या वेळातही आकाशातले रंग किती वेगाने आणि नकळत बदलत जातात! आधी रात्रीचा काळा रंग हळू हळू निळा होता जातो...मग स्वच्छ पांढरा जणू काही सूर्य नारायणाला आकाशाच्या पटावर चित्र काढण्याची रोज लहर येते :) क्षितिजावर हळू हळू तांबडा गुलाबी रंग- सोनेरी चमकणारे ढग असा मन मोहवून टाकणारं दृष्य!! आणि मग दिवसाला खरी सुरुवात होते.
एक प्रसन्न सकाळ - दिवसभराची लाही सोसता यावी याची तयारी !!!
दुपार मात्र मला फारशी आवडत नाही :(
संध्याकाळी परत उतरती उन्हं वेगळेच रंग घेऊन साथीला येतात. थकल्या भागल्या सूर्य देवाला आणि चराचराला शांत करण्यासाठी!
यात अजून सौंदर्य भरण्यासाठी की काय...निसर्ग राजा अगणित फुलांनी नटून थटून बसतो :)
अगणित झाडांवर अगणित रंगांची फुलं, फळं, फळांचे मोहोर वेडावून टाकणारे सगळे काही :)


आजकाल रोज संध्याकाळी ऑफिस च्या बस ने घरी जाताना हिंजवडी मधल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बोगन वेल आपल्या सौंदर्याने बहरून हसत असते :)बरयाच वेळा बंगल्यांच्या कुम्पानांवर सुद्धा !! किती किती रंग असतात तिचे ? पांढरा, गुलाबी, पिवळा, अबोली!!! हिच्या वेलीला कुठलेही वळण नाही...आकाराचे बंधन नाही!! अनेक रंगांचे कारंजे फुटल्या सारख्या हिच्या फांद्या अस्ताव्यस्त वाढत असतात...भरभरून फुलं अंगावर खेळवत असतात! तिच्या या अनिर्बंध सौंदर्याची मी रोज मनात दृष्ट काढते :) थोडा हेवाच वाटतो मला तिचा :)







एव्हाना फळांचा राजा कुठे मोहरलेला दिसतो तर कुठे त्याची आंबट गोड कैरी झालेली असते ..कुठल्याही रुपात हा सुंदरच दिसतो :) आपल्या गर्द हिरव्या पानांमध्ये विराजमान होऊन आपल्या मनावर राज्य करायला तयार!!!


अचानक कुठेतरी सोनसळी बहावा मोहक पिवळ्या रंगाची उधळण करताना दिसतो! हिरवी पाने कधीची हरवलेली असतात.उरतात फक्त पिवळी फुले :) याला बघण्यात मी दिवसच्या दिवस घालवू शकेन असे वाटत राहते. मला मंत्रमुग्ध करून टाकते त्याचे पिवळेपण :)याला "सुवर्णिका" म्हणतात हे मला आत्ताच कळलं :)





गुलमोहोर पण लाल, पिवळ्या,फिकट जांभळ्या रंगांची फुले घेऊन स्पर्धेत उतरतो :) वारयावर हलके हलणारी तलम पानं आणि असंख्य फुलं!!





चाफ्याला कसे विसरता येईल? पांढरा, लाल चाफा टपोरी कर्णफुले शांत आणि मंद मंद मिरवत असतो :) घराजवळच्या चाफ्याचा एक तरी फुल मिळतंय का याची आम्ही जाता येता वाट पाहत असतो :) त्याचा शांत रंग आणि मंद सुवास देवघरातल्या अत्तराचीच आठवण करून देतो :)

छोटी छोटी फुलझाडं तरी कशाला मागे राहतील?




मोगरा, जाई, शेवंती, जास्वंद, अबोली, कण्हेर, गुलाब, झेंडू, निशिगंध,सोनचाफा, सदाफुली आणि हजारो शोभेची झाडं ज्यांची मला तरी नावं ठावूक नाहीत आपापले सौंदर्य खुलवत असतात :)






एकूणच चैत्र गौरी बरोबर येणारा वसंत ऋतू सौंदर्याची लयलूट करून माहेरवाशी गौरीचे सगळे लाड पुरवत असतो :) आणि आपल्या डोळ्यांचे पारणे फेडत असतो :)






आपल्याला निसर्गाची केवढी साथ आहे याची जाणीव हे सौंदर्य पाहिल्यावर आल्याशिवाय राहत नाही. गरज वाटते ती फक्त आपल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांची! आपल्या पैकी प्रत्येकाने एक का होईना असे सुंदर झाड घराजवळ लावले तर आपला परिसर आपोआपच स्वर्ग- सुंदर होईल! ..हो ना?

Tuesday, March 23, 2010

आठवणी मनातल्या २ - बाबा!


कुणीतरी म्हटलं आहे की आई , बाबा आपल्यासाठी काय असतात हे आपण स्वतः आई / बाबा झाल्याशिवाय कळत नाही. मलाही याचा अनुभव मी स्वतः आई झाल्यावर आला :) माझ्या पिल्लू चे लाड करताना, "अरे बापरे, आपल्या आई बाबांनी आपल्यासाठी हे सगळं किती नकळत केलं !" याचा प्रत्यय येत गेला. आणि आपण त्यांना नेहेमी किती गृहीत धरतो याची जाणीव झाली.
माझे बाबा ११ नोव्हेंबर २००८ रोजी गेले. त्यादिवशी फक्त त्यांना आम्ही डोळेभरून पाहून घेत होतो. बाबा असताना जितके जाणवले त्यापेक्षा ते नसताना जास्ती जाणवत आहेत!! आम्हाला वाढवताना त्यांनी ज्या छोट्या छोट्या गोष्टी अगदी मनापासून केल्या त्यांचा अर्थ खरेच किती मोठा होता हे आता जाणवते आहे.
मधेच एखादी गोष्ट आठवते आणि बाबांच्या खूप सऱ्या आठवणी येतात. त्यांच्यात बाबांना परत भेटल्याचे वेगळेच समाधान असते :)
लहानपणी आम्ही तिघी मुली म्हणून वाईट वाटून घेताना मी कधीच त्यांना पाहिलं नाही ...उलट ते कधी मजेत तर कधी अभिमानाने म्हणायचे ,"हे माझे ३ लाख आहेत!" :) आणि आम्हाला त्या वाक्याची खूप मजा वाटायची :) .त्यांच्यासाठी आम्ही खूप विशेष आहोत याची जाणीव ते आम्हाला हळूच करून देत.

उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही अंगणातल्या जिन्यावर बसून बाबा ऑफिस मधून यायची वाट पाहायचो. लांबवर बाबांच्या लुना चा लाईट दिसायचा आणि जवळ आले की बाबा मिश्कील पणे हॉर्न वाजवून गेट उघडा असे सुचवायचे. ती वाट पाहताना आणि लांबून येणारी गाडी बाबांची आहे की नाही याचा तर्क करताना एकदम मजा यायची :)

कधी शाळेला बुट्टी मारून घरी बसलो तर बाबा अंघोळ घालण्यापासून सगळं मनापासून करायचे.आणि मग कानात तेल घातलंच पाहिजे याचा अट्टाहास करायचे. मग आमचा आरडा ओरडा !!! ...मग हट्ट करून आम्ही त्यांच्या बरोबर ऑफिसमध्ये जायचो आणि व्रीन्दावन हॉटेल मध्ये इडली सांबर खायचो :)

आमचे घर गावाबाहेर असल्याने बाहेरची कामं बाबा एकदम मनापासून करायचे.गावातून भाजी /किराणा आणणे , आम्हाला शाळेत घ्यायला येणे ...गाडीवर कितीही लांब जायला सांगा ते नेहेमी तयार !!
फिरण्याची त्यांना खूप आवड होती. आपण भारतातली कुठली ठिकाण पहिली हे ते अभिमानाने सांगत.वैष्णव देवीला जायची इच्छा मात्र अपुरीच राहिली !!!

गणपतीच्या दिवसात आम्ही बाबांबरोबर जाऊन गणपाती आणायचो.आरती करायचो.मग विसर्जनाला पण आम्ही बाबांच्या मागे मागे हजर !!

सिनेमा पाहणे हे त्यांची अजून एक आवड !! त्यासाठी केबल घेतली होती घरी.फायटिंगचे सिनेमा त्यांना खूप आवडायचे.एखादा सिनेमा पहायचा ठरले की न पाहता परत यायचे नाही!!!

उन्हाळ्याच्या रात्री गच्चीवर झोपलो की बाबांना येणारी हातींम ताईची गोष्ट आम्ही १०० वेळा तरी ऐकली असेल :)ती रंगवून रंगवून सांगताना त्यांनाच खूप मजा वाटायची :)आणि हो आली बाबा चाळीस चोर सुध्धा !!

सुट्टीत कॅरम , पत्ते , सापशिडी , व्यापार असे सगळे खेळ ते आमच्या बरोबर खेळायचे.

गाडी चालवायला येत नसताना मला स्कूटर त्यांनीच शिकवली ..."हि स्कूटर ...अशी चालू करायची,हा ब्रेअक ...हे गेअर्स , हा क्लच, असे असे वापरायचे.." असे सांगून गाडी हातात देऊन बाबा लांब जाऊन उभे राहत ...मग पडा, झडा आणि शिका!!! गाडीला काही होईल आणि या मुली आहेत म्हणून त्यांनी गाडी शिकू नये असे त्यांनी कधीच केले नाही. त्यामुळेच आता आम्ही तिघी बहिणी कार सुद्धा आत्मविश्वासाने चालवतो :)

आंब्याच्या दिवसात आंब्याची पेटी आणणे आणि तो कसा हापूस आंबा आहे हे आम्हाला रंगवून सांगणे !...मग रस काढणे हे बाबांचे काम :)

दिवाळीत फटाके नवीन कपडे आणणे , आकाशदिवा आणणे ,आईने केलेले फराळाचे चवीने खाणे ...छोट्या छोट्या गोष्टी !!..आम्ही थोड्या मोठ्या झाल्यावर घरीच आकाशदिवा कसा तयार करायचे ते बाबांनीच शिकवले. त्यासाठी सगळे समान आणायला आम्हाला घेऊन जाणे.किती मजा यायची छोट्या छोट्या गोष्टींमध्ये!

परीक्षेच्या वेळी मनावर ताण आला की ..."राहू दे अभ्यास ...सिनेमा पहा मस्तं!!" म्हणायचे :) एखादी कॅडबरी आणून द्यायचे :)

तिघींना कुणाला कशाची आवड आहे हे पाहणे आईचे काम आणि त्या त्या स्पर्धांना घेऊन जाणे, बक्षीस मिळाले की / भेळ खाऊ घालणे , बागेत नेणे ...रॉयल ची पिस्ता कुल्फी , Kasata आईस्क्रींम , माळी वाड्यातला रगडा पाटीस, अप्पू हत्ती जवळचा कारंजा ...सगळं सगळं आमच्यासाठी :)

नवीन स्कूटर घेतली तेव्हा MIDC मधून ८० च्या वेगाने आम्हाला चक्कर मारून आणताना किती अभिमान वाटत होता बाबांना !!!

आम्ही कुणीही आजीकडे राहत असलो तर रोज एकदा ऑफिसमधून घरी जाताना भेटीला यायचा नियम त्यांनी कधी मोडला नाही.पोस्टाचे / बँकेचे व्यवहार आम्हला आलेच पाहिजेत असा आग्रह!...

मुली असलो तरी तिघींना engineering चे शिक्षण ,त्यासाठी पुण्यात admission घेऊन आम्हला लांब ठेवताना त्यांनी आमच्यावर जो विशास टाकला त्याचे मोल काय ? कुठल्याही प्रकारे मुली आहेत म्हणून घरात डांबून ठेवायचे नाही ."तुला जे आवडते ते कर" ...असा नेहेमी पाठींबा देत.

बाबांनी आमच्यावर कधीही स्वतःची मते लादली नाहीत. त्यांचा कधी मार खाल्ल्याचे मला तरी आठवत नाही. आम्ही थोड्या मोठ्या झाल्यावर त्यांना आमची एखादी गोष्ट पटली नाही तर तसे स्पष्ट सांगायचे आणि पुढे आम्ही काय करायचे ते आमच्यावर सोपवायचे. फार तर अबोला धरतील, पण त्याचीच आम्हाला जास्ती भीती वाटायची. बाबा आमच्याशी बोलले नाहीत तर काय उपयोग ? मग आमची गाडी स्वताहून रुळावर यायची :)पण यामुळेच त्यांच्या शब्दाला नेहेमी मान मिळत असे. शांत राहूनही आणि न मारतही मुलांना वळण लावता येते याचे उदाहरणच त्यांनी घालून दिले होते :)

माझ्या engineering admission च्या वेळी डायलिसीस करून माझ्याबरोबर रांगेत येऊन उभे राहिले होते.
१० वर्ष त्यांनी kidney failure ला तोंड दिले ...अनेक शस्त्रक्रिया, डायलिसीस सहन केल्या ...त्यांना किती त्रास होत आहे याची आम्हाला कधी जाणीव सुद्धा होऊ दिली नाही ..ते आजारी आहेत असे रडगाणे कधीच गायले नाही त्यांनी ..त्यांची सहनशक्ती आणि मनाचा निर्धार कमालीचा होता ..स्वतः आजारी असताना आमच्या तब्येतीची काळजी घ्या सांगायचे ...

बाबा गेल्यावर एक महिन्याने गौरीचे, माझ्या सगळ्यात लहान बहिणीचे लग्न होते. पण आईने जोपर्यंत समोर येऊन खंबीरपणे सांगितले नाही की मी तिचे लग्न छान करेन तोपर्यंत त्यांच्या पिंडाला कावळा शिवला नाही. हा चमत्कार होता का? माणूस गेल्यावर पण त्याचे मन आपल्यात इतके गुंतून राहते का?

आपल्या प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहावे, छान आयुष्य जगावे हीच त्यांची इच्छा होती. आज कधी नोकरी सोडून घरी बसावे असा विचार मनात आला तर बाबांची आमच्याकडून हि अपेक्षा नक्कीच नसेल . आमच्या शिक्षणा साठी त्यांनी कार घेतली नाही कधी अवाजवी खर्च केले नाहीत आणि ते सगळे वाया कसे घालवायचे? या विचाराने मन परत खंबीर होते.
"कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला!" या ओळीचा अर्थ बाबांच्या वागण्यातून कळला!

आताही बाबा भेटतात. आठवणींमध्ये, स्वप्नात आणि अजूनही खूप धीर देऊन जातात!!